मंगळवार, सप्टेंबर 19, 2023

महाराष्ट्रातील ‘या’ ९ जिल्ह्यांत रेड अलर्ट

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ । मागील गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, २३ जुलै या कालावधीत मुंबईसह महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर व रायगड या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे.

जून महिन्यात सुरुवातीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. परंतु त्यानंतर जुलै महिना उजाडला तरी देखील पावसाने राज्यात ओढ दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केले आहे. संपूर्ण कोकणासह मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील इतर ठिकाणी देखील पावसाने हजेरी लावलीय. 

भारतीय हवामान विभागाकडुन 9 जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सलग 4 दिवस महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढलेली आहे. जुलै महिना अर्धा संपला तरी राज्याच्या अनेक तालुक्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पावसाने अशीच पाठ फिरवली तर पिण्याच्या पाण्याची समस्याही उद्भवू शकते.

राज्यातील 13 तालुक्यात 25 ते 50 टक्केच पाऊस झाला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील 5 तालुके आणि नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुक्यांचा समावेश आहे. 33 तालुक्यात 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे. तर 309 तालुक्यात 75 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले आहे.

जळगाव जिल्ह्यातही पावसाची हजेरी

जळगाव जिल्ह्यात देखील मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती. परंतु मागील दोन दिन दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुकवला आहे. काल मंगळवारी देखील जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर आज पहाट पासून पावसाने हजेरी लावली आहे.