जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२६ । देशातील आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करता तो ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही सलग तिसरी वेळ आहे, जेव्हा आरबीआयने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यामुळे कर्जदारांना सध्या तरी कोणताही दिलासा मिळाला नाही. होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील मौद्रिक धोरण समितीने (एमपीसी) तीन दिवसांच्या बैठकीनंतर आज बुधवारी रेपो दर जाहीर करण्यात आला आहे. यावेळी रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर आहे. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेणे खूप आव्हानात्मक होते.

आरबीआयने गेल्या वर्षभरात रेपो दरात एकूण १२५ बेसिस पॉइंट्सची (१.२५%) कपात केली आहे. मात्र, यावेळी वाढत्या महागाईच्या भीतीमुळे आणि आर्थिक विकासातील अपेक्षित मंदतेमुळे रेपो दर अपरिवर्तित ठेवण्यात आला. आरबीआयने आपल्या भविष्यातील अंदाजांमध्ये किंचित सुधारणा केली आहे. आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीसाठी जीडीपी वाढीचा दर पूर्वीच्या ६.७% वरून ६.९% पर्यंत वाढवण्यात आला आहे. दुसऱ्या तिमाहीसाठी तो पूर्वीच्या ६.८% वरून ७% पर्यंत वाढवण्यात आला आहे.
रेपो दर म्हणजे काय?
ज्या दराने आरबीआय बँकांना कर्ज देते, त्याला रेपो दर म्हणतात. रेपो दरात वाढ होण्याचा अर्थ असा आहे की बँकांना आरबीआयकडून जास्त दराने कर्ज मिळेल. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजदर वाढतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या ईएमआयवर होईल.
दरम्यान, आता रेपो रेटमध्ये बदल न झाल्याने व्याजदरातदेखील काही बदल होणार नाहीये. तुमच्या कर्जाचे व्याज तसेच राहणार आहे. त्यामुळे तुमचा ईएमआय कमी होणार नाहीये. होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनचा हप्ता तसाच सुरु राहणार आहे. या रेपो रेटवर तुमचा ईएमआय किती वाढणार की कमी होणार हे समजते. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.












