⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

…म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, राणा दाम्पत्याची मोठी घोषणा

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाच्या बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Navneet Rana And Ravi Rana) यांनी आपली भूमिका बदलली आहे. राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाणार नसून त्यांनी अखेर ‘मातोश्री’बाहेर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याची भूमिका मागे घेतली आहे. देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे उद्या मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आपण हा निर्णय घेतला असल्याची माहिती रवी राणा यांनी दिली

रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. यावेळी खासदार नवनीत राणाही उपस्थित होत्या. मोदी उद्या मुंबईत येणार आहेत. मोदी हे देशाचा गौरव आहेत. आमदार आणि खासदार म्हणून त्यांच्या दौऱ्यात काहीही अनुचित प्रकार घडू नये हे आमचं कर्तव्य आहे.

पंतप्रधानांसारखं व्यक्तीमत्त्व आपल्या शहरात येत असेल तर त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागता कामा नये. पंतप्रधानांचा दौरा रद्द व्हावा असं त्यांना वाटतं. पण वेळात वेळ काढून मोदी येत आहेत. ते कोणती तरी दिशा देतील. त्यामुळे त्यांचा दौरा निर्विघ्न पार पडावा म्हणून आम्ही आमचं आंदोलन स्थगित करत आहोत, असं रवी राणा म्हणाले.

दरम्यान, आज सकाळी ९ वाजता राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाऊन हनुमान चाळीस पठण करणार होते. त्याच पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले होते. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येव्हडच नव्हे तर राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानाला शिवसैनिकांनी वेढा घातला होता. या संपूर्ण प्रकरणावरून मुंबईत वातावरण चिघळले होते. अखेर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी माघार घेतल्याची घोषणा केली आहे