NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!

जून 27, 2026 2:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२६ । राज्यातील शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना मोठा धक्का देणारी बातमी आहे. ती म्हणजे उद्या २८ जून रोजी होणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा’ (TET) अखेरच्या क्षणी तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे पहाटे पोलिसांच्या कारवाईत परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघडकीस आले असून, त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Maha TET exam cancelled

एकीकडे देशभरात गाजलेल्या ‘नीट’ (NEET) प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटीची धग आणि देशभरातील विद्यार्थ्यांचा संताप अजून शांत झालेला नसतानाच, आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचे भूत पुन्हा एकदा मानगुटीवर बसले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने MAHA TET ही परीक्षा तडकाफडकी रद्द (स्थगित) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी आज शनिवारी पहाटे एका संशयास्पद ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत काही इसमांकडे आगामी टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळणारे साहित्य आणि प्रश्न आढळून आले. पोलिसांनी तात्काळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (MSCE) अधिकाऱ्यांना पाचारण केले. अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, हा मूळ प्रश्नपत्रिकाच लीक झाल्याचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेली MAHA TET ची परीक्षा उद्या म्हणजेच २८ जून रोजी पार पडणार होती. या परीक्षेसाठी राज्यभरातील सुमारे 2 लाख 26 हजार उमेदवार बसणार होते. मात्र, परीक्षेच्या अवघ्या काही तासांपूर्वी पेपर लीक झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून पेपरफुटीमागील दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, रद्द झालेल्या TET परीक्षेची नवीन तारीख लवकरच अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

‘नीट’ परीक्षेतील गोंधळामुळे आधीच लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यातच आता राज्यातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी ‘टीईटी’ परीक्षाही सुरक्षित राहू शकलेली नाही. वारंवार होणाऱ्या या पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परीक्षा घेणाऱ्या यंत्रणांच्या विश्वासार्हतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now