⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून खडसे नणंद-भावजय आमनेसामने

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२१ । राज्यात सध्या ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून ठिणगी पडली आहे. याच मुद्द्यावरून खडसे कुटुंबात खटके उडाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी केलेल्या एका ट्वीटवर खडसे यांच्या स्नुषा व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी टोलेबाजी केली आहे.

रोहीणी खडसे यांनी, ‘भाजपाला ओबीसींचा कधीपासून कळवळा यायला लागला’ या आशयाचे ट्वीट केले असता त्यावर खासदार रक्षा खडसे यांनी, ‘रोहिणी खडसे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सदस्या असल्याने त्यांना पक्षाने सांगितले म्हणून त्या बोलत असाव्यात’, असा टोला लगावला आहे. 

नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत खुल्या वर्गातून भाजपतर्फे सर्व ओबीसी उमेदवारांना तिकीट देऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ‘भाजपला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? आता गळा काढण्यात अर्थ नाही’, असे ट्वीट रोहिणी यांनी केले आहे.

रोहिणी खडसे यांच्या या टीकेला रक्षा खडसे यांनीही पत्रकारांशी बोलताना जोरदार उत्तर दिलं आहे. रोहिणी खडसे या सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादीच्या सदस्या आहेत. त्यांच्या पक्षाने त्यांना सांगितलं आहे, तसे त्या बोलत आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राजकारण बाजूला ठेऊन सत्ताधारी पक्षाने ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी टीप्पणीही रक्षा खडसे यांनी पुढे जोडली. नाना पटोले हे ओबीसी नेते आहेत, सत्ताधारी पक्षाचे प्रमुख आहेत. ओबीसी समाजाची दिशाभूल न करता त्यांनी राज्य सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणे आवश्यक असल्याचेही खासदार खडसे यांनी सांगितले.