जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२५ । भारतातील बहुतांश लोक रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेनं कमी पैशात लांबचा प्रवास करता येतो. मात्र आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आता चाप बसणार आहे. कारण भारतीय रेल्वेने १ जुलै २०२५ पासून तिकिटांच्या किंमतीत वाढ केली आहे. सर्व सामान्य प्रवाशांसोबतच (जनरल) एसीने प्रवास करणाऱ्यांना तिकिटासाठी आता अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहे.

रेल्वेच्या नव्या तिकिट दरानुसार, सेकंड क्लासच्या तिकिटासाठी ५०० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी कोणताही वाढ झालेली नाही. पण हा प्रवास ५०० किमीपेक्षा जास्त असेल तर प्रति किमी अर्धा पैसा जास्त तिकिट द्यावे लागले. त्याशिवाय मेल, एक्सप्रेस ट्रेनमधील नॉन एसी प्रवाशांना प्रति किमोमीटर एक पैसा जास्त द्यावा लागणार आहे. एसीच्या तिकिट दरांमध्ये प्रति किमी २ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

लांब पल्ल्याच्या प्रवासावर या भाडेवाढीचा परिणाम होणार आहे. जर एखादा प्रवासी जळगाव ते दिल्ली (११२५ किमी) नॉन-एसी ट्रेनने प्रवास करत असेल तर त्याला ११ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. तर एसी क्लाससाठी २२ रुपये मोजावे लागणार आहेत.
दिलासादायक म्हणजे, मासिक पासच्या दरांमध्येही कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. वृत्तानुसार, यापूर्वी रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत जर तुम्ही रेल्वे तिकीट बुक केले तर तुम्हाला तिकीट कन्फर्म आहे की नाही हे तुमच्या प्रवासाच्या चार तास आधी कळत असे. पण आता रेल्वे एका नवीन प्रणालीवर काम करत आहे. रेल्वेचे म्हणणे आहे की कन्फर्म सीट्स असलेला चार्ट प्रवासाच्या २४ तास आधी जारी केला जाईल.रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नवीन प्रणालीची तयारी सुरू केली आहे. यासाठी चाचणी देखील सुरू झाली आहे.
तत्काळ तिकीट नियमात बदल
याशिवाय, रेल्वे मंत्रालयाने १ जुलै २०२५ पासून आयआरसीटीसी वेबसाइट आणि अॅपद्वारे सर्व तत्काळ तिकिट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे. हा निर्णय, तत्काळ योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी आणि केवळ खरोखर गरजू प्रवाशांना तिकिटे दिली जातील याची खात्री करण्यासाठी आहे.












