जळगावात राष्ट्रवादीला मोठा धक्का : शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२३ । राज्यात सत्तांतर झाल्यापासून एकीकडे ठाकरे गटाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नसताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसलाही गळती लागत असल्याचे दिसून येतेय. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.

येणाऱ्या निवडणुकीसाठी आतापासूनच भाजपकडून रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे दोन दिवसापूर्वीच जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निकाल लागला. या निवडणुकतही राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना धक्का बसला आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.

त्यातच आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पाचोरा तालुक्यातील लोहारा गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला भाजपकडून हा मोठा धक्का मानला जात आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा मोठा फायदा हा भाजपला होण्याची शक्यता आहे.