जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२६ । जळगावच्या पाचोरा शहरात अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांनी गुटखा माफियांविरोधात एक मोठी कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या धाडसी छाप्यात तब्बल ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामुळे अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

अन्न सुरक्षा विभागाला पुनगाव रोड परिसरात उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि पानमसाला साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी पाचोरा पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकला.

कारवाईदरम्यान वाहनाची तपासणी केली असता डिक्कीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याचा साठा आढळून आला. पथकाने सुमारे ४ लाख रुपयांची कार आणि ४ लाख ९८ हजार रुपयांचा गुटखा असा एकूण जवळपास ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी प्रशांत चौधरी याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायळ हे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.
या धडक कारवाईमुळे पाचोरा शहरासह परिसरात प्रतिबंधित गुटख्याचा अवैध साठा आणि विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.











