जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२३ । ऑनलाईन फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढत असून यात वेगवेगळ्या आमिषातून अनेकांना हजारो-लाखोंचा चुना लावला जात आहे. अशातच धरणगावच्या एका व्यावसायिकाला देखील लोन मंजूर करून देण्याच्या नावाखाली तब्बल ९ लाख १५ हजार ९८ रूपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आलीय. याबाबत सायबर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
नेमका काय आहे प्रकार?
धरणगाव येथे रहिवाशी असलेले व्यापारी जीवनराम आनंदाराम कुमावत (वय ४२) याना गेल्या २७ मार्चपासून त्यांना त्यांच्या मोबाईलवर मिनाक्षी अग्रवाल, आलिया, रूही शर्मा, सुधीर सक्सेना अशा वेगवेगळ्या नावाने संपर्क करुन कर्ज प्रकरणासंबधी बोलणे झाले.
आम्ही देशातील नामांकित फायनान्स कंपनीतून लोन मिळवून देतो असे आमीष दाखवून त्या कंपनीसह अन्य कंपनीच्या पॉलीसी काढण्यास भाग पाडण्यात आले. कुमावत यांनी विवीध कंपन्यांच्या पॉलिसी काढल्यावर आपल्याला कर्ज मंजुर होईल, अशी अपेक्षा होती. त्यानंतर २७ मार्च ते २६ सप्टेंबरपर्यंत त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने एकुण ९ लाख १५ हजार ९८ रूपये मागवून घेतले.
त्याच्या मोबदल्यात कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर न करता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुमावत यांनी जळगाव सायबर पेालिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरुन सायबर पोलीसात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत.