⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

जळगाव मनपात लेटर बॉम्ब : मनपा आयुक्तांनी मागितले ३ टक्के, सहाय्यक अभियंत्याचे तक्रार पत्र

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । जळगाव शहर मनपातील सहाय्यक अभियंता अरविंद भोसले यांनी मोठा लेटर बॉम्ब टाकला असून थेट मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यावर आरोप केले आहेत. शहर अभियंता म्हणून काम पाहत असताना मनपा आयुक्तांनी मक्तेदारांकडून विकासकामांच्या देयकावेळी ३ टक्के रक्कम आणून देण्याचे सांगितले असल्याचा आरोप पत्रात केलेला आहे. दरम्यान, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अरविंद भोसले २००२ पासून कार्यरत असून, ऑक्टोबर २०२० पसून ऑक्टोबर २०२१ पर्यंत त्यांच्याकडे शहर अभियंता पदाचा प्रभारी कार्यभार सोपवण्यात आला होता. १३ दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेल्यानंतर आयुक्तांनी तो पदभार कनिष्ठ अभियंता विलास सोनवणी यांना दिला. रजेवरून परत आल्यानंतर मात्र, आपल्याकडे पुन्हा तो पदभार साेपवला गेला नाही, अशी तक्रार करीत त्यामागे आयुक्त कुळकर्णी यांचा आर्थिक स्वार्थ असल्याचा आरोप नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलेल्या पत्रात भोसले यांनी केला आहे. दिनांक १० फेब्रुवारी अशी तारीख भोसले यांनी पत्रावर टाकली आहे. त्याच्या प्रती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील दोन आमदारांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

अरविंद भोसले यांनी पाठविलेल्या पत्रातील मजकूर पुढीलप्रमाणे जशाचा तसा…, मा.महोदय, विनंती अर्ज की, जळगांव शहर महानगरपालिकेत मी अरविंद दिनकर भोसले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता (सिव्हील पदवीधर) म्हणुन सन 2002 पासून कार्यरत आहे. श्री. सुनिल भोळे (सहा. अभियंता सिव्हील पदवीधर) यांचे कडेस शहर अभियंता पदाचा प्रभारी पदभार होता. ते जुलै 2020 मध्ये सेवानिवृत्त झाल्याने श्री.ङिएस. खडके (सहा. अभियंता पदवीधर) यांचे कडेस प्रभारी शहर अभियंता पदाचा पदभार दिलेला होता ते दिनांक 30/09/2020 रोजी सेवा निवृत्त झाल्याने सेवा जेष्टता यादीनुसार मा. आयुक्ते सो. यांचा आदेश क्र./आस्था/934/2020 दिनांक 30/09/2020 अन्वये प्रभारी शहर अभियंता पदाचा पदभार मला देण्यांत आला. मी या पदावर दिनांक 1/10/2020 पासून कार्यरत असतांना करोना काळात अमृत योजना व इतर कामे कमी वेळात चांगल्या पध्दतीने केल्याबद्दल उत्कृष्ट कामाबद्दल मला अतिरीक्त दोन वेतनवाढ देणे व अभिनंदनाचा ठराव मा. महासभेने एकमताने ठराव क्र.370 दिनांक 26/02/2021 पारित केलेला आहे. शहर अभियंता पदाचे कामकाज करीत असतांना मा. आयुक्त सतिश कुलकर्णी सो. यांनी त्यांचे कक्षात मला बोलावून मक्तेदारांकडून विकास कामांच्या देयकावेळी 3% प्रमाणे रक्कम आणुन देण्यास सांगितले असता मी स्पष्टपणे त्याच वेळी नकार दिला यास्तव त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सन्माननीय नगरसेवक श्री. प्रशांत नाईक यांनी प्रकल्प विभागाचे श्री. योगेश बोरोले क. अभियंता यांचे कडिल रॅप बांधणे कामाचे व देयकाची संपुर्ण कागदपत्रे माहिती अधिकारात मागणी केलेली होती ती अपिल अधिकारी म्हणून मी त्यांना उपलब्ध करून दिली. त्यांनी म.न.पा. निधीतून कार्यादेश असतांना केंद्र शासनाच्या घनकचरा प्रकल्प निधीतून सदर देयक रक्कम रु.44 लक्ष मक्तेदारास अदागीय मा. आयुक्त श्री. सतिश कुलकर्णी यांनी मान्यता दिल्याने तसेच या देयकावर मुख्यलेखाधिकारी श्री. कपिल पवार साहेब यांनी सदर बिल संशयीत असल्याचा अभिप्राय नोंदविलेला आहे. श्री. प्रशात नाईक यांनी कागदपत्राच्या आधारे आर्थिक अपहार व गैरव्यवहाराची सर्व विभागात तक्रार केल्याने तसेच स्थानिक वृत्तपत्रात वृत्त आल्याने त्यांनी कागदपत्र देणे बाबत माझ्यावर नाराजी दर्शविली होती.

जळगांव शहर महानगरपालिकेस जळगांव जिल्हा नियोजन समिती मार्फत सन 20-21 व सन 21-22 मधील विकास कामांकरीता 50 कोटी पेक्षा जास्त शासकीय निधीतुन मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी प्रशासकीय मान्येतेचे आदेश निर्गमित केलेले आहेत. मा. जिल्हाधिकारी सो. जळगांव यांचे कडिल पत्र क्र.नपा/नियोजन / आर.आर./741/2021 दिनांक 17/06/2021 अन्वये म.न.पा.च्या एकूण वेगवेगळे 72 कामांना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतील रक्कम रु.215894279/- प्रशासकीय मान्यता मिळालेली होती. या 1 ते 72 विकास कामांची निविदा कामानिहाय प्रसिध्द करणेसाठी दिनांक 07/07/2021 रोजी कार्यालयीन टिपणी सार्व. बांधकाम विभागामार्फत माझी शहर अभियंता म्हणुन स्वाक्षरीने सादर केलेली होती. या टिपणीवर मुख्य लेखा परिक्षक श्री. वाहुळे सो. यांचे देखिल लेखी अभिप्राय व स्वाक्षरी नंतर मा. आयुक्तांनी या निविदा काम निहाय निविदा प्रसिध्दीस दिनांक 19/07/2021 रोजी मान्यता दिलेली होती. तसेच मा. जिल्हाधिकारी सो. यांचे पत्र क्र. 15/नियोजन/आर.आर./767/2021 दिनांक 05/07/2021 अन्वये नागरी दलीत्तेर निधीतून 1 ते 17 कामांना रक्कम रु.72168359/- प्रशासकीय मान्यता देण्यांत आलेली आहे या 1 ते 17 प्रकरणांची कामनिहाय निविदा प्रसिध्द करण्याची टिपणी सार्व. बांध. (म.न.पा.) विभागामार्फत माझी शहर अभियंता म्हणुन स्वाक्षरी नंतर मुख्यलेखा परिक्षक श्री. वाहुळे यांचा अभिप्राय व त्यांची स्वाक्षरी घेवुन मा. आयुक्तांकडे सादर केलेली होती. त्यास मा. आयुक्त यांनी दिनांक 17/08/2021 रोजी या निविदा प्रसिध्द टिपणीस मान्यता दिलेली होती. तद्नंतर निविदा अटी शर्ती शासनाच्या सार्व. बांध विभागाकडिल निविदेनुसार करणेचा मा. महासभा ठराव पारित झाल्याने त्यानुसार माहिती घेवून नविन अटी शर्ती समाविष्ट करणेची कार्यवाही सुरु होती. ऑक्टोबर महिन्यात मा. आयुक्त यांनी या दोन्ही निधीतील यापूर्वीच्या निविदा अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराने प्राप्त झाल्याने व कोणत्याही मक्तेदारस काम द्यावे लागत असुन त्यात स्वत:चा आर्थिक फायदा होत नसल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली व कमी दराने निविदा प्राप्त होवून शासनास शिल्लक निधी परत जावून मला काही उपयोग होत नाही, असे सांगितले “विशिष्ट प्रभागातील विशिष्ट विकासकामे विशिष्ट मक्तेदारास अंदाजपत्रकीय दरात मला द्यावयाची असल्याने मी सांगतो त्या प्रमाणे विकास कामांचा ग्रुप करुन निविदा प्रसिध्द करा” असे तोंडी सांगितले. सदर बाब नियमबाह्य व शासकीय निधीचा अपहार बाबत भविष्यात चौकशी घेवून गुन्हा दाखल होईल असे मी सांगितल्याने त्यांनी मी सांगतो त्या पध्दतीने काम न केल्यास तुमचे सेवापुस्तक रंगवून टाकेन अशी धमकी दिली. यास्तव माझे मानसिक संतुलन बिघडल्याने मला वैद्यकीय रजा दिनांक 06/10/2021 ते 18/10/2021 घ्यावी लागली.

मी रजेवर गेल्याने त्यांनी तांत्रिक पदाची सेवाजेष्टता यादी डावलून श्री. विलास ओंकार सोनवणी, पा.पु.क. अभियंता DCE यांचे कडेस प्रभारी प्रभाग अधिकारी पदाचा पद्धार असतांना शहर अभियंता पदाचा अतिरीक्त पदभार मा. आयुक्तांनी दिला मी दिनांक 18/10/2021 रोजी कामावर हजर झालेनंतर मला शहर अभियंता या पदाचा पदभार देण्यात आलेला नव्हता. शहर अभियंता पदाचा अतिरीक्त पदभार श्री. सोनवणी यांना देवून त्यांचे कडून या शासकीय निधीतील कामांच्या नियमबाह्य ग्रुप करून निविदा प्रसिध्द करणेची नविन टिपणी घेवून त्यास आयुक्तांनी मान्यता दिलेली आहे. या सर्व टिपणीवर मुख्य लेखा परिक्षक यांनी अभिप्राय देण्यास व स्वाक्षरी करणेस नकार दिल्याने शहर अभियंता व आयुक्त यांच्या स्वाक्षरी या टिपणीवर आहे व त्याप्रमाणे या निविदा प्रसिध्द करुन नियमबाह्य निविदा प्रक्रीया संगनमताने राबविण्यात आली. या प्राप्त झालेल्या निविदेतील एकही काम अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी न जाता त्याच दरात किंवा जास्त दराने सर्व निविदा प्राप्त झालेल्या आहेत. हे आजही सत्य प्राप्त निविदा दरांची चौकशी अंती आढळुन येईल. 2. महाराष्ट्र शासनाच्या शिल्लक 25 कोटी नगरोत्थान निधीतून शिल्लक विकास निधीतील रामदास कॉलनी खुल्या जागेस कुंपणभिंतीचे प्रकरणी प्रथम निविदा प्रसिध्द केली व लगेच कोणतेही कारण नसतांना प्रसिध्द निविदा रह केली व पुन्हा या प्रसिध्द केली या जाहिर निविदेचा स्थानिक वृत्तपत्राचा खर्च देखिल शहर अभियंता श्री. सोनवणी यांचे कडून वसुल होणे आवश्यक आहे. अतिशय अंदाधुंद नियमबाह्य प्रकार आयुक्त व शहर अभियंता संगनमताने करीत आहेत.

दिनांक 18/10/2021 रोजी मी हजर झालेनंतर मला पुन्हा शहर अभियंता पदाचा पद्भार दिला नाही तसेच कामकाज काय करावे या बाबत आदेश दिलेला नव्हता मी सहाय्यक अभियंता म्हणुन या विभागात हजर राहत होतो एक दिवस मा. आयुक्तांना भेटण्यास त्यांचे कक्षात गेलो असतांना पदभार बाबत विचारणा केली असता त्यांनी मला शहर अभियंता पदाचा पदभार देण्यास नकार दिला व स्पष्टपणे सांगितले की “तुमचे प्रशासकीय काम चांगले आहे पण तुम्ही मी सांगतो त्या निविदा मॅनेजची टिपणी सादर करीत नाहीत. निविदा प्रकीया राबवित नाही, मक्तेदारांकडून विकास कामांचे देय्यक वर 3% रक्कम मला आणून देत नाहीत, तुमचे काम चांगले असले तरी आर्थिक दृष्ट्या मला तुमचा काहीही उपयोग नाही. तसेच यापुर्वी उपायुक्त फातले यांना ABC च्या ताब्यात दिल्याने मला विचार करावा लागतो. मला तांत्रिक कर्मचारी बदली व पोष्टींगचे पैसे देतात मी कोणालीही कुठेही नेमू शकतो नगररचना विभागात पुराणीक, शिरसाठ यांना मी दिले अतुल पाटील ट्रेसर असतांना रचना सहाय्यक चे काम दिले, समिर बोरोले, शकील शेख हे सर्व मी सांगतो त्या प्रमाणे प्रकरणे सादर करतात. सोनवणी DCE असल्याने शासकीय निधीतील कामांना तांत्रिक मंजूरीचे अधिकार त्यांना नाहीत हे मला माहित आहे तसेच ते सेवाजेष्टता यादीत लुले नंतर पा.पु.यादीत आहे हे पण मला माहित आहे पण सोनवणी मला पाहिजे तशी टिपणी सादर करतात व इतर गोष्टीपण पाहतात त्यामुळे मी सोनवणी यांना शहर अभियंता पदाचा पदभार दिला. श्री. लुले क. अभियंता वाहन विभाग प्रमुख शे. इस्माईल क.अभि. यांना अतिक्रमण विभाग प्रमुख आरोग्याधिकारी विकास पाटील यांना जन्म-मृत्यु विभाग ते मला उपयोगाचे नसल्याने मी तशा पोष्टींग दिल्या नगररचना विभागात सहाय्यक नगररचनाकारची दोन पदे रिक्त आहेत मी तुम्हाला देवू शकतो पण मला तुमच्या पासुन कोणताही आर्थिक लाभ नाही तसेच उपायुक्त फातले यांचे ACB प्रकरण न्यायालयात असल्याने या पदांवर तुम्हांला देणार नाही.” अशा पध्दतीने सांगण्यात आलेले होते तद्नंतर मा. आयुक्तांनी जा.क्र./ आस्था / 1457 दिनांक 03/11/2021 आदेशानुसार प्रभारी प्रभाग अधिकारी प्रभाग समिती क्र.4 ला नेमणूक दिली. प्रत्यक्षात प्रभाग अधिकारी पदास शासनाने सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांना दिलेले असतांना त्यांना आरोग्याधिकारी म्हणून त्यांनी दिलेले होते. प्रभाग अधिकारी पद हे माझे कार्यासन नसतांना व संवर्ग नसतांना व माझ्या वेतनश्रेणी पेक्षा कमी वेतन श्रेणीचे पद असतांना निव्वळ मानसिक त्रास देणे व सेवा जेष्ट असतांना निम्न पदावर मला प्रभाग अधिकारी पद सामाजीक प्रतिष्ठेस हानी पोहचविण्यासाठीच देण्यात आलेले आहे. तरी या सर्व प्रकरणाची चौकशी होवून आयुक्त श्री. कुलकर्णी साहेब व प्रभारी शहर अभियंता श्री. सोनवणी यांचे वर संगनमताने शासकीय निधीचा अपहार व मनमानी कार्यपध्दती बाबत आयुक्तांवर कारवाई व्हावी ही नम्र विनंती.

दरम्यान, या संदर्भात आयुक्त सतीश कुळकर्णी यांनी एका दैनिकाला प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे हा प्रशासकीय भाग आहे. अरविंद भाेसले हे आता व यापूर्वीही प्रभाग अधिकारी हाेते. त्यांना शहर अभियंता पदाची जबाबदारी मीच दिली हाेती; परंतु ते रजेवर गेल्यामुळे पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे साेपवावा लागला. भाेसले हे एका वर्षापेक्षा जास्त काळ शहर अभियंता हाेते. तेव्हा त्यांना त्रास झाला नाही; मग आत्ताच कसा त्रास हाेताेय? बिले मंजुरी असाे की निविदा प्रक्रिया ही ठरलेल्या प्रशासकीय कामकाजानुसार हाेते. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार, अनियमिततेच्या आराेपातही तथ्य नाही. काेणालाही पाठीशी घालण्याचा विषय नाही, असेही आयुक्त म्हणाले. यासंदर्भात आपल्याला विचारणा हाेईल तेव्हा म्हणणे मांडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :