जळगावकरांसाठी मोठी बातमी : शहर बस सेवा सुरु होणार; २० किमीसाठी मनपाला ५० ई-बसेस

जळगाव लाईव्ह न्यूज | १५ सप्टेंबर २०२३ | जळगावकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शहर बससेवेचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. जळगावकर गेल्या १० वर्षांपासून शहर बससेवेपासून वंचित आहेत. शहरात बससेवा सुरू कधी सुरु होईल? या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. महानगरपालिकेच्यावतीने शहरालगतच्या २० किलोमीटर अंतरात सेवा देण्यासाठी ई-बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्याठी पीएम बससेवा योजनेंतर्गत ५० बसगाड्या मनपाला मिळणार आहेत.

शहरात महापालिकेच्यावतीने बससेवा सुरु करण्याच्या प्रस्तावाला दि.२३ ऑगस्ट रोजी झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली होती. त्यापार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दि.१ सप्टेंबर रोजी एक पत्र दिले. पीए योजनेंतर्गत ५० बसेस जळगावात दाखल होणार आहेत. या बसेसच्या थांब्यासाठी, देखभालीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या बसस्थानक, छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल परिसर, सामाजिक न्याय भवनासह अन्य जागांची पाहणी केली.

जेएमटीयू २०१४ पासून बंद

एसटीने जळगाव शहरात यापूर्वी शहर बससेवा दिली होती. यात २००१ ते २००५ दरम्यान या सेवेत त्यांना सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे एसटी विभागाने ही सेवा बंद केली. त्यानंतर महापालिकेने २००११ मध्ये शहर बससेवा ओम साई सिटी सर्व्हिसेस या कंपनीला मक्तेदाराला चालवायला दिली होती. मक्तेदाराने जळगाव शहरातील विविध भागात सुमारे २५ बसेसद्वारे जेएमटीयू बस सेवा सुरू केली होती. मात्र करारनाम्याची अटी शर्तींची पूर्तता महापालिका करीत नसल्याने तसेच बसेसला थांब्यासाठी जागा उपलब्ध करून न दिल्याने अखेर मक्तेदाराने ५ नोव्हेंबर २०१४ पासून ही शहर बससेवा थांबविली. तेंव्हापासून शहर बससेवा बंदच आहे. मध्यंतरी विद्यापीठासाठी बस सुरु करण्याचा प्रयोग झाला मात्र आधीसारखी सेवा जळगावकरांना अजूनही मिळत नाहीये.

नागरिकांपेक्षा विद्यार्थ्यांचे अधिक नुकसान

जेएमटीयू बस बंद झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपेक्षा विद्यार्थ्यांचे अधिक नुकसान झाले आहे. कारण विद्यापीठ, बांभोरी जाण्यासाठी ‌विद्यार्थीच या बसेसचा जास्त वापर करत होते. जेएमटीयू बसेसमुळे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, बांभोरी इंजीनिअरिंग कॉलेजला जातांना अडचण येत नव्हती. या मार्गावरील विद्यार्थी व नागरिकांसाठी ही सेवा फायदेशीर ठरत होती. मात्र शहर बस सेवा बंद झाल्यापासून विद्यार्थ्यांना रिक्षातून महागडा व धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

या जागांचा विचार

१) महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार जुने बसस्थानकाची जागा योग्य राहील. ही जागा ताब्यात घेतल्यास बससेवेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपालाही सोयीस्कर पडणार आहे.
२) छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुलाभोवती असलेल्या जागेचाही जिल्हा प्रशासन विचार करीत आहे.
३)अजिंठा चौफुल परिसरातील एस.टी.महामंडळाच्या जागेवर वाहनतळासाठी मोठी जागा आहे. रात्रीतून बसेस त्याठिकाणी मुक्कामी थांबवायच्या आणि सेवा देण्यासाठी जुन्या बसस्थानकाच्या जागेचा वापर करायचा, असेही जिल्हा प्रशासनाचे मत आहे.