रविवार, डिसेंबर 3, 2023

.. तरच पगार निघेल, कामचुकार कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मनपा घेतला ‘हा’ निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२३ । जळगाव शहर महापालिकेत अद्यापही काही कर्मचारी असे आहेत जे केवळ हजेरी नोंदवायला येतात. मात्र, आता अशा कामचुकारांना वठणीवर आणण्यासाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक कार्यालयात बायोमेट्रीक मशिन बसवले जाणार असून यात थम्ब इंम्प्रेशनसोबत आता फेस रिडींग केले जाणार आहे. जेथे ही यंत्रणा असेल तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.

महापालिकेने तीन वर्षांपूर्वी बायोमेट्रीक हजेरी यंत्रांचा वापर सुरू केला. परंतु, कोरोनामुळे दोन ते अडीच वर्ष ही प्रक्रीया बंद करण्यात आली होती. यावेळी युनिट कार्यालयांत दिलेले डिव्हाइस कपाटात ठेवून उपयोगात नसल्याची भूमिका घेतली होती. परंतु, आता सर्वच विभागांत बायोमेट्रीकचा वापर सुरू झाल्याने मनपाने देखील प्रशासकीय इमारत, प्रभाग समिती कार्यालये, प्रत्येक युनिट कार्यालयात बायोमेट्रीकद्वारे हजेरी नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबरपासून हजेरी नोंदवणे बंधनकारक केले आहे.

सतरा मजलीत प्रत्येक मजल्यावर गरजेनुसार एक किंवा दोन मशिन लावले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी दिली. कामाचे मूल्यांकन होईल मनपात प्रत्येक कर्मचाऱ्याला बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक केल्यानंतर कामावर आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याने दिवसभरात केलेल्या कामाचे मूल्यांकन केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक विभागात रजिस्टर दिले जाणार आहे. यामुळे कामावर न येणाऱ्यांना आधी कामावर हजर व्हावे लागेल. कामही करावे लागेल तरच पगार निघेल.