जळगाव लाईव्ह न्यूज : १२ एप्रिल २०२४ : स्टार्टअप ही संकल्पना आता पुणे-मुंबईपुरता मर्यादित राहिलेली नाही. आपल्या जळगाव जिल्ह्यात अनेक स्टार्टअप सुरु होत आहेत. तरुणाईच्या या स्टार्टअप्समुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होत आहे. येणाऱ्या काळात जळगावला स्टार्टअप हब बनविण्यासाठी माझे प्राधान्य राहिल, असे आश्वासन जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी आज जळगाव स्टार्टअप ग्रृपच्या सदस्यांना दिले.
स्मिताताई वाघ यांनी आज जळगावमधील स्टार्टअप्स, लघू उद्योग-व्यवसाय वाढी संदर्भात स्टार्टअप फाऊंडर्स व को-फाऊंडर्ससोबत चर्चा केली. श्री एजन्सीमध्ये झालेल्या या ‘स्टार्टअप पे चर्चा’ या कार्यक्रमात जळगावमध्ये स्टार्टअप संस्कृती वाढण्यासाठी कोणत्या बाबींची आवश्यकता आहे, यावर चर्चा झाली. यावेळी जळगावमधील स्टार्टअप फाऊंडर्संनी त्यांच्या नाविन्यपूर्ण व्यवसायाची माहिती देत, भविष्यात काय केले पाहिजे, याबाबत काही अपेक्षा व्यक्त केल्या. यास उत्तर देतांना स्मिताताई वाघ म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशात स्टार्टअप कल्चर वाढत आहे. यात जळगावची तरुणाई देखील मागे नाही, हे पाहून खूप आनंद होत आहे. मी आज लोकसभा निवडणूक लढवित आहे. मात्र राजकारणाआधी मी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. प्रिटींग उद्योगात मी गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहे. माझ्या कामाची दखल घेत मला जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उत्कृष्ट उद्योजिका पुरस्काराने गौरविले असल्याचे सांगितले.
जळगावमध्ये विमानतळ, रेल्वे व रस्त्यांचे जाळे अशी व्यवस्था आहे. यामुळे येथे स्टार्टअप वाढीसाठी खूप संधी आहेत. केळी व कापसापासून अनेक प्रक्रिया उद्योग येथे सुरु होवू शकतात. यासाठी येथील तरुणाईला केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मी कटिबध्द आहे. कारण जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्टअप व उद्योग सुरु झाल्यास येथील तरुणाईला नोकरीसाठी पुणे किंवा मुंबई येथे जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही श्रीमती वाघ यांनी नमूद केले. या चर्चेप्रसंगी जळगाव स्टार्टअप ग्रृपचे अजिंक्य तोतला, आर्यन मणियार, डॉ. युवराज परदेशी, निखिल जाधव, योगेश चौधरी, तेजस पाटील, तुषार भांबरे, रजत भोळे, निखिल पाटील, मकरंद डाबिर, हरेक सोनी, अभिषेक राकेचा, अकुंर साळूंखे, राहूल जैन, आशुतोष रांगा, निकुंज रांगा, कुश फुले, अक्षय पाटील, मौलिक कुमत, लोकेश काबरा, आकाश पाटील, प्रतिक वरयाणी, अर्चना महाजन यांच्यासह आदी सदस्य उपस्थित होते.