जळगाव लाईव्ह न्यूज । देशभरात उन्हाचा कडाका असह्य होत असून संपूर्ण देशाचे लक्ष मॉन्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. अशातच मॉन्सूनबाबत अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दक्षिण गोलार्धातील हवामानातील सकारात्मक बदल आणि हिंदी महासागरात तयार होत असलेल्या अनुकूल वातावरणामुळे यंदा नैर्ऋत्य मॉन्सूनच्या वाटचालीला चांगलाच वेग मिळाला आहे. भारतीय उपखंडाकडे मॉन्सून सरकण्याची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, नेहमीच्या वेळेनुसार म्हणजेच १ जूनच्या आसपास मॉन्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होण्याची दाट शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने २०२५-२६ चा उत्तर ऑस्ट्रेलियातील पावसाळी हंगाम अधिकृतरीत्या संपल्याची घोषणा केली आहे. हवामानशास्त्राच्या नियमानुसार, ऑस्ट्रेलियातून मॉन्सून माघारी फिरल्यानंतर उत्तर गोलार्धातील वातावरणीय हालचालींना प्रचंड वेग येतो. यामुळेच आता हिंदी महासागर परिसरात कमी दाबाच्या पट्ट्यांची निर्मिती होऊन भारतातील मॉन्सूनच्या आगमनासाठी अत्यंत पोषक आणि अनुकूल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

वातावरणातील ‘हा’ मोठा बदल ठरणार निर्णायक
सध्या ‘इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन’ म्हणजेच ITCZ हा कमी दाबाचा पट्टा वेगाने उत्तर दिशेकडे सरकत आहे. हा पट्टा सध्या मालदीवच्या उत्तरेकडून दक्षिण श्रीलंका आणि अंदमान-निकोबार बेटांपर्यंत विस्तारलेला दिसून येत आहे. मॉन्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकण्यापूर्वी वातावरणात घडून येणारा हा अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य बदल मानला जातो. त्यामुळे येत्या काही दिवसांत मॉन्सूनच्या हालचाली अधिक स्पष्ट आणि वेगवान होतील.
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, देशात पुढील ७ दिवस हवामानात टोकाचे बदल पाहायला मिळतील. दक्षिण भारतातील पुढील ७ दिवस अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तमिळनाडू, केरळ, पुदुचेरी, माहे, कराईकल तसेच दक्षिण कर्नाटकात पुढील काही दिवसांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि लक्षद्वीप परिसरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे, उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून काही भागांत अचानक मेघगर्जना, विजा आणि गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.











