जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२६ । दीर्घ विश्रांतीनंतर अखेर मान्सूनने महाराष्ट्रात वेगवान आगेकूच केली असून, जळगावसह राज्यातील अनेक भागांत मंगळवारी आनंदसरी कोसळल्या. गेल्या दोन आठवड्यांपासून खोळंबलेल्या मान्सूनने पुन्हा गती घेतल्याने, कडक ऊन आणि तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज बुधवारीही हवामान खात्याने जळगावसह राज्यातील २९ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे. जळगावला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगावात उन्हाचा चटका आणि आर्द्रतेमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले होते. सोमवारी जळगावात ३९.४ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारी सकाळीही हवेतील आर्द्रता थेट ७० टक्क्यांवर पोहोचल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र, सकाळी ११ वाजेनंतर वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने हजेरी लावली. या पहिल्याच चांगल्या पावसामुळे तापमानात मोठी घसरण होऊन ते ३५.२ अंश सेल्सिअसवर आले, ज्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

दरम्यान, मंगळवारच्या पावसानंतर आज बुधवारी पहाटेपासूनच पावसाने पुन्हा हजेरी लावली. यानंतर काही वेळ विश्रातीनंतर सकाळी अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरू होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज राज्यातील काही जिल्ह्यांना रेड तर काहींना ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे, यात जळगाव जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, दिवसभरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जून महिना संपायला अवघे काही दिवस उरले असताना, पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. दरम्यान सध्या झालेल्या पावसामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या असून, जमिनीत पुरेशी ओल होण्यासाठी आता जिल्ह्यात जोरदार आणि दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी वर्ग करत आहे. आगामी २४ तासांत पावसाचा जोर वाढल्यास पेरण्यांना वेग येण्याची चिन्हे आहेत.






