⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस ; २० दिवसात १९८ नागरिकांना चावा

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । शहरात मोकाट कुत्र्यांमुळे दहशतीचे वातावरण पसरले असून अवघ्या २० दिवसात कुत्र्यांनी १९८ जणांना चावा घेतल्याची माहिती समोर येत आहे.

शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक  नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच कुत्र्यांचे शिकार ठरत आहे. गेल्या २० दिवसात या कुत्र्यांनी १९८ नागरिकांना चावा घेतला आहे. 

शहरातील  मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांपासून नागरिकांना अधिक धोका आहे. झुंडीने राहणाऱ्या कुत्र्यांमध्ये पिसाळण्याची शक्यता अधिक असते. अस्वच्छ खाणे, अस्वच्छ वातावरणासह काही अन्य कारणांमुळे रेबीजचे विषाणू कुत्र्याच्या शरीरात प्रवेश करू शकतात. हे विषाणू त्याच्या लाळेत असतात. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर लाळेचा संसर्ग इतरांना झाल्यास रेबीज होऊ शकतो. कचरा कुंड्या, ओस पडलेले पॉट, चिकन दुकाने, मटण दुकाने, चायनीजची दुकाने, कत्तलखाने व कंपोस्ट डेपो परिसरात कुत्र्यांच्या झुंडी कायम आहेत.

उपचार –

कुत्रे चावल्याने जखम झाल्यावर लवकर ती स्वच्छ करावी, त्यामुळे रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेबीजवर ॲन्टीरेबीज व्हॅक्स लस उपलब्ध आहे. रुग्णाने रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस घेतले पाहिजे. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात, चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत.

कुत्रे चावल्यावर उपाय –

जखम स्वच्छ साबणाने धुवून काढावी, जंतुनाशक लावावे. जास्त रक्तस्त्राव होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत

हे टाळा –

जखमेवर चुना, हळद, माती, तंबाखू, चहा पावडर, लिंबू असे पदार्थ लावू नये, जखमेला पट्टी बांधू नये, टाके घालू नयेत