जळगावच्या रिंग रोड काँक्रिटीकरणाचा आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते शुभारंभ; डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणार

जून 27, 2026 6:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२६ । जळगाव शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंग रोडच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेविका ॲड शुचिता हाडा, माजी महापौर तथा नगरसेवक नितीन लढ्ढासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Ring Road concretization

गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून ७ कोटी रुपयांचा निधी आमदार राजूमामा भोळे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर देखील झाला होता.

निधी मिळाला असला तरी या भागात महानगरपालिकेच्या अंडरग्राउंड ड्रेनेजचे खोदकाम होणार होते. रस्ता तयार केल्यानंतर तो पुन्हा फोडावा लागू नये, म्हणून आधी ड्रेनेजचे काम पूर्ण करावे आणि त्यानंतरच रस्ता हाती घ्यावा, अशा सूचना आमदार भोळे यांनी मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार बहिणाबाई उद्यान ते गोकुळ स्वीटमार्टपर्यंतच्या एका बाजूचे ड्रेनेजचे काम मागील आठवड्यात पूर्ण करण्यात आले. निवडणूक आचारसंहिता संपताच, आज लगेचच या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

पहिल्या टप्प्यात एका बाजूचे काम १ महिन्यात पूर्ण केले जाईल. त्याचे क्युरिंग झाल्यावर त्या बाजूने वाहतूक सुरू केली जाईल आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम हाती घेतले जाईल. या कामाची अधिकृत मुदत दीड वर्षांची असली, तरी येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत दोन्ही बाजूंचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आणि मक्तेदार गौरव राजेश पाटील यांनी दिली.

ख्वाजामिया चौक ते आकाशवाणी चौक दरम्यानच्या रिंगरोडचे काँक्रिटीकरण ‘व्हाइट टॉपिंग’ पद्धतीने केले जाणार आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाच, त्या भागातील विजेचे निकामी झालेले पोल बदलणे आणि पाईप गळती दुरुस्त करणे ही कामे आत्ताच करून घ्यावीत, अशा कडक सूचना आमदार राजूमामा भोळे यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, जेणेकरून नंतर रस्ता पुन्हा खोदावा लागणार नाही. या रस्त्यामुळे जळगावकरांचा प्रवासाचा मोठा प्रश्न सुटणार असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now