जळगाव लाईव्ह न्यूज । अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कारवाई केलेले सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-१) किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या जळगावातील सीलबंद घरात घुसखोरीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराचे कुलूप तोडून शिडीच्या सहाय्याने आत प्रवेश करणाऱ्या दोन संशयितांना जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी अकोला येथील एसीबीने किरण चौधरी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर जळगावातील गणेश कॉलनी परिसरातील साईप्रभा आर्केड येथील त्यांच्या निवासस्थानी तपासाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे एसीबीच्या जळगाव पथकाने हे घर सीलबंद करून सुरक्षित ठेवले होते.

शनिवारी रात्री उशिरा या सीलबंद घरातून काहीतरी संशयास्पद आवाज येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कोणतीही दिरंगाई न करता तातडीने याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता, घराच्या मागील बाजूने शिडी लावून दोन जण आतमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सापळा रचून या दोघांनाही जागीच रंगेहाथ पकडले. प्राथमिक तपासात संशयितांनी चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात अनधिकृत प्रवेश केल्याचे समोर आले आहे. घरातील मौल्यवान वस्तू चोरणे किंवा एसीबीच्या तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकणारे पुरावे हटविणे वा नष्ट करणे, याच उद्देशाने हा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला असावा, असा दाट संशय तपास यंत्रणेला आहे.
या खळबळजनक प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, जळगाव एसीबीच्या पोलीस निरीक्षक स्मिता वसंत नवघरे यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या दोघांची कसून चौकशी करत असून, यामागे नेमका कोणाचा मास्टरमाइंड आहे, याचा तपास करत आहेत.









