जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२६ । जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या दरात मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी दरात मोठी पडझड झाल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच गुरुवारी बाजार उघडताच सोन्यासह चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी नोंदवण्यात आली. चांदी थेट ५ हजारांनी तर सोने १ हजार रुपयांनी महागल्याने ग्राहक आणि गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

काय आहे सोने-चांदीचा दर?
जळगाव सराफ बाजारात आज गुरुवारी सकाळी बाजारपेठ सुरू होताच २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १,०३० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे तीन टक्के जीएसटीसह सोन्याचा भाव १ लाख ४७ हजार २९० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. दुसरीकडे, चांदीच्या दरात प्रति किलो ५,१५० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली असून तीन टक्के जीएसटीसह चांदीचा भाव २ लाख ४१ हजार २० रुपये प्रति किलो झाला आहे.यापूर्वी काल बुधवारी दिवसभरात ३०९ रुपयांची वाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे १,४६,२६० रुपयांपर्यंत पोहचले होते.

सराफा व्यावसायिकांच्या मते, जागतिक बाजारातील आर्थिक घडामोडी, अमेरिकन डॉलरमधील चढ-उतार, व्याजदरांबाबतची अनिश्चितता आणि देशांतर्गत मागणीतील बदल यामुळे सोने-चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने अस्थिरता दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाईघाईने निर्णय न घेता बाजारातील परिस्थितीचा अभ्यास करूनच खरेदी किंवा गुंतवणूक करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.












