जळगावात लाचखोरीचे सत्र सुरूच! भूमी अभिलेख कार्यालयाचा भूकरमापकाला लाच घेताना जाळ्यात

जुलै 2, 2026 9:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या लाचखोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, यातच आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आणखी एक मोठी कारवाई केली आहे. जळगाव जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी रंगेहाथ अटक केली. जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५) असं लाचखोर भूकरमापकाचे नाव असून या धडक कारवाईमुळे महसूल आणि भूमी अभिलेख विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

lach jpg webp

तक्रारदाराच्या वडिलोपार्जित घराच्या नोंदीत दुरुस्ती करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करण्यात आला होता. संबंधित नोंद दुरुस्त करून तक्रारदाराच्या वडिलांचे नाव पुन्हा सातबारा उताऱ्यावर नोंदविण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही काम प्रलंबित राहिल्याने तक्रारदाराने संबंधित कार्यालयात पाठपुरावा केला.

यावेळी भूकरमापक जितेंद्र पाटील याने हे काम करून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी १० हजार रुपये आणि स्वतःसाठी ५ हजार रुपये, अशी एकूण १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला.

सापळ्यादरम्यान जितेंद्र पाटील यांनी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला १ जुलै रोजी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश बाखुरे यांनी केले. तर पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now