जळगाव पोलिसांची दमदार कारवाई; अवघ्या ५ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड, दोन अट्टल चोर जेरबंद

जून 27, 2026 4:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. शिवाजीनगर परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा अवघ्या पाच तासांत उघडकीस आणत दोन सराईत चोरांना अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीस गेलेला ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत याप्रकरणी दोघांवर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ddc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी रात्री ते २६ जून रोजी सकाळी शिवाजीनगर, भगतसिंग चौक येथील एका घरात घरफोडी झाली होती. फिर्यादी सुशील भाईलाल भावसार (वय ६१) यांच्या घरातून डेल कंपनीचा लॅपटॉप, दोन मोबाईल फोन, पितळी कळशी आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता.

या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी राफत शेख फिरोज (वय २०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) आणि शेख शारीम उर्फ मुसाब (वय २०, रा. सिंहगड, शिवाजीनगर हुडको, जळगाव) या दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान दोघांनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला डेल कंपनीचा लॅपटॉप, दोन मोबाईल, पितळी कळशी आणि रोख रक्कम असा ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने केली. घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणत आरोपींना अटक करण्यात आल्याने जळगाव शहर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now