⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मोठी बातमी : ८ तासांच्या चौकशीनंतर मंत्री नवाब मलीक यांना अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक(Navab Malik) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी ED) ने सकाळी चौकशीसाठी कार्यालयात नेले होते. तब्बल आठ तासांचा चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या जबाबात त्यांचे नाव आल्याने मलिकांची ईडीकडून चौकशी केली जात होती.

गुन्हेगारांकडून जमीन खरेदी केल्याचा ठपका ठेवत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीच्या पथकाने सकाळी चौकशीसाठी बोलावले होते. नवाब मलिक यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेले गेले आहे. जे.जे.रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे त्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात येईल.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोर्चा घेऊन ईडीच्या कार्यालयावर धडकले असून असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याठिकाणी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. ‘ईडी’च्या कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या बॅलर्ड पिअर येथील कार्यालयात नेण्यात आले आहे. येथूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय काही अंतरावरच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना याठिकाणी जमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून यासंदर्भात भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नवाब मलिक हे मंत्री आहेत. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्व संकेत धुडकावून त्यांना ताब्यात घेतले. ही गंभीर गोष्ट असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी ईडीने कुख्यात गुंड दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी इकबाल कासकरने नवाब मलिक यांचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याचप्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून नवाब मलिक यांची चौकशी केली जात आहे.

हे देखील वाचा :