अमळनेरराजकारण

जिल्हा बँकेत भाजप उमेदवाराची माघार; आमदार अनिल पाटलांच्या पत्नींची बिनविरोध निवड निश्चित!

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या प्रक्रियेदरम्यान महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मनव विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रफुल्ल पवार यांनी माघार घेतली असून परिणामी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी जयश्री अनिल पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर उमेदवारांच्या माघारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. कोणत्या मतदारसंघात कोण माघार घेणार आणि कोणाला संधी मिळणार, याबाबत उत्सुकता होती.

याचदरम्यान मनव विकास सोसायटी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रफुल्ल पवार यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या माघारीमुळे या मतदारसंघातील निवडणुकीची चुरस संपुष्टात आली असून जयश्री पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार विविध मतदारसंघांमध्ये उमेदवारी आणि माघारीचे निर्णय घेतले जात आहेत. प्रफुल्ल पवार यांच्या माघारीकडेही याच राजकीय समीकरणाचा भाग म्हणून पाहिले जात आहे.

जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button