⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

नागरिकांच्या आंदोलनांनंतर महापौर ॲक्शन मोडमध्ये : मक्तेदारांना केल्या ‘या’ सूचना

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । जळगाव शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून सर्वच रस्त्यांवर खड्डेच सर्वच खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून आंदोलने केली जात असल्यामुळे आता महापौर जयश्री महाजन ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत. महापौरांनी मनपा अधिकारी व मक्तेदारांची बैठक घेवून शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा सुचना केल्या.

रस्त्यांची कामे पावसाळ्यामुळे सुरु करता येत नसले तरी त्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम मक्तेदाराने सुरु करावे, अशा सुचना संबधित मक्तेदारांना केल्या आहेत. शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून शहरात संततधार पाऊस सुरु असल्यामुळे रस्त्यांवरील खड्डयांचे प्रमाण वाढले असून सर्वत्र चिखल निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांचा संताप अनावर होऊ लागला असून नागरिकांकडून आंदोलने होऊ लागले आहेत. म्हणून महापालिकेच्या सर्व रस्त्यांची डागडुजी करा असे आदेश महापौरांनी दिले आहेत.

याआधी दुपारी महापौरांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. शहरातील मुख्य रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि नागरिकांचा होत असलेला आक्रोश पाहता सार्वजनिक बांधकाम विभाग या अंतर्गत येणार्‍या प्रमुख रस्त्यांची डागडुजी करुन खड्डे बुजविण्यासंदर्भातही महापौर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना विनंती केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी लवकरात लवकर संबंधित मक्तेदाराला सूचना देऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले. याप्रसंगी जळगाव शहर महानगरपालिकेचे शहर अभियंता एम.जी.गिरगावकर, नगर रचनाकार करवंदे, शकील शेख, सोनगिरे आदी अधिकारी उपस्थित होते.