जळगाव लाईव्ह न्यूज । महान कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी भाषेचा अभिमान जपणे आणि तिचा प्रचार-प्रसार करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी कृष्णा राठोड, तेजस्विनी उगळे, ऋषिकेश पाटील आणि देवेंद्र पाटील या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व मनोगतातून व्यक्त केले. कवी सुरेश भट लिखित लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गीत विद्यार्थी ऋषिकेश पाटील यांनी सादर केले. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी कविता, लेख, नाटके, गीते लिहावीत व विविध साहित्यिक स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले .

आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचे व ती जपण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष शाखेतील विद्यार्थी चेतन चौधरी या विद्यार्थ्यानी केले.ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी अमुची या श्रीरंग गोडबोले लिखित गीताचे विद्यार्थी चेतन चौधरी यांनी अतिशय सुंदर गायन केले. कार्यक्रमाचे समन्वयक ग्रंथपाल प्रा. नाकुल गाडगे यांनी केले.










