⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

आजपासून मनुदेवीचा चैत्र वरात्रौत्सवाला सुरुवात

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील आडगाव जवळील श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरात शनिवारपासून चैत्र नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने यंदाच्या चैत्र नवरात्रोत्सवात भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध झाली आहे.

मनुदेवी मंदिरात चैत्र पाडव्यानिमित्त चैत्र नवरात्रौत्सवास सुरुवात होत आहे. नवरात्रीला घटस्थापना करून पौर्णिमेपर्यंत मंदिरावर यात्रा भरते. घट पूजेचा मान शनिवारी माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व आमदार लता सोनवणे यांना देण्यात आला आहे. त्यांच्या हातून घटस्थापना करण्यात येणार आहे.

त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, नितीन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुनील महाजन, सोपान वाणी, एन. डी. चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे. संस्थानचे व्यवस्थापक आर. के. पाटील, समाधान कोळी, गोपाल पाटील, जालम पाटील व दगडू महाराज यांनी तयारी केली आहे. यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात साफसफाई करण्यात आली आहे. यात्रेत नवस फेडणे, जाऊळ आणि शेंडीचा मान देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर चावदसला आडगाव येथील विश्वदीप पाटील व दीपक पाटील यांच्या हातून ध्वज लावला जाईल.