जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील साकळी येथील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र निलेश सुधाकर बडगुजर यांनी भारतीय सैन्य दलात तब्बल २४ वर्षे देशसेवा बजावल्यानंतर ३१ जुलै २०२६ रोजी हवालदार मेजर (कंपनी हवालदार मेजर) या मानाच्या पदावरून सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती घेतली. त्यांच्या उल्लेखनीय सेवेमुळे साकळी गावासह संपूर्ण यावल तालुक्याचा अभिमान उंचावला आहे.

निलेश बडगुजर यांनी ११ जून २००२ रोजी गोवा येथे भारतीय सैन्याच्या सिग्नल रेजिमेंटमध्ये प्रशिक्षण घेऊन आपल्या लष्करी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये तसेच संवेदनशील भागांमध्ये कर्तव्य बजावत त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत अखंडपणे जोपासले.

सेवाकाळात त्यांनी आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान, कारगिल (जम्मू-काश्मीर), हरियाणा, नवी दिल्ली आणि नागालँड या ठिकाणी विविध सिग्नल रेजिमेंट व ब्रिगेडमध्ये जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. कर्तव्यनिष्ठा, शिस्त, नेतृत्वगुण आणि उत्कृष्ट सेवेमुळे त्यांनी कंपनी हवालदार मेजर या प्रतिष्ठेच्या पदापर्यंत मजल मारली.
देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्यातील २४ वर्षे समर्पित करणाऱ्या निलेश बडगुजर यांच्या गौरवशाली सेवेला सलाम करण्यासाठी ते मूळ गावी साकळी येथे आल्यानंतर साकळी गाव आणि यावल शहरात त्यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात येणार आहे.
या सत्कार सोहळ्याला गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून त्यांचा सन्मान करणार आहेत. यावेळी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात येणार आहेत.
शेतकरी कुटुंबातील एका युवकाने भारतीय सैन्य दलात २४ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत गाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याने साकळी गावात आनंदाचे वातावरण आहे. त्यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवास आजच्या युवकांसाठी आदर्श ठरत असून, देशसेवेची प्रेरणा देणारा आहे.












