गुरुपौर्णिमेनिमित्त यावलच्या श्री महर्षी व्यास मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ

जुलै 29, 2026 5:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२६ । गुरुपौर्णिमेनिमित्त जळगाव जिल्ह्यातील यावल येथील प्राचीन श्री महर्षी व्यास मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. देशभरातून आलेल्या भाविकांनी श्री महर्षी व्यास यांचे दर्शन घेत पूजा-अर्चा करत कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. संपूर्ण मंदिर परिसर दिवसभर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता.

yawal vyas mandir

पहाटे श्री महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचा विधिवत दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर वैदिक मंत्रोच्चारात महाआरती संपन्न झाली. दर्शनासाठी मोठी गर्दी अपेक्षित असल्याने मंदिर प्रशासनाने विशेष नियोजन करून भाविकांना सुरळीत दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली.

महाभारत लेखनाशी जोडलेली पौराणिक परंपरा

यावल येथील श्री महर्षी व्यास मंदिराला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतातील मोजक्या व्यास मंदिरांपैकी हे एक मंदिर मानले जाते. याच ठिकाणी महर्षी व्यास आणि भगवान श्री गणेश यांनी महाभारताचे लेखन केल्याची श्रद्धा आहे. तसेच अनेक पवित्र ग्रंथांची निर्मितीही याच स्थळी झाल्याचे मानले जाते. प्रभू श्रीरामांसह अनेक देवी-देवतांनी या परिसराला भेट दिल्याच्या आख्यायिकाही भाविकांमध्ये प्रचलित आहेत.

एक क्विंटल डाळिंबांच्या आरासचे आकर्षण

यंदाच्या गुरुपौर्णिमेचे मुख्य आकर्षण म्हणजे एक क्विंटलपेक्षा अधिक डाळिंबांचा वापर करून साकारण्यात आलेली भव्य आरास. गाभाऱ्याबाहेर आणि गाभाऱ्यात केलेल्या या अनोख्या सजावटीने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. लालसर डाळिंबांच्या आकर्षक सजावटीमुळे मंदिर परिसराचे सौंदर्य खुलून दिसत होते. अनेक भाविकांनी या आराससोबत छायाचित्रे काढत हा अविस्मरणीय क्षण टिपला.

भक्तिमय वातावरणाने भारावले मंदिर परिसर

सातपुड्याच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले श्री महर्षी व्यास मंदिर वर्षभर भाविकांचे श्रद्धास्थान असते. मात्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे विशेष उत्साह आणि भक्तीचे वातावरण अनुभवायला मिळते. धार्मिक विधी, वैदिक परंपरा आणि हजारो भाविकांची उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून गेला. गुरुपौर्णिमेनिमित्त उमटलेली भाविकांची गर्दी आणि प्राचीन परंपरेचे जतन पाहता, श्री महर्षी व्यास मंदिर हे जळगाव जिल्ह्यासह देशभरातील श्रद्धाळूंसाठी महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now