जळगाव लाईव्ह न्यूज । महावितरणच्या वीज बिलांबाबत आणि ढिसाळ कारभाराबाबत ग्राहकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशातच जळगाव शहरात महावितरणचा आणखी एक धक्कादायक आणि अनागोंदी कारभार समोर आला आहे. शहरातील सम्राट कॉलनीमधील एका सामान्य ग्राहकाला अवघ्या ३० दिवसांत चक्क ७५ हजार ९०० रुपयांचे वीज बिल पाठवून महावितरणने मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे तक्रार करायला गेलेल्या ग्राहकाला बिल दुरुस्त करून देण्याऐवजी ‘हप्त्या-हप्त्याने पैसे भरा’ असा अजब सल्ला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सम्राट कॉलनीतील रहिवासी ग्राहक सुशीलाबाई श्रीश्रीमाळ यांना मे आणि जून महिन्याच्या ३० दिवसांच्या कालावधीसाठी ३ हजार ६७६ युनिटचा वीज वापर दाखवण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना ७५ हजार ९०० रुपयांचे अव्वाच्या सव्वा बिल आले आहे.

याबाबत त्यांचे कुटुंबीय प्रदीप श्रीश्रीमाळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “घरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज वापरणारी कोणतीही मोठी उपकरणे नसताना हजारो युनिटचा वापर दाखविण्यात आला आहे. हा महावितरणचा मनमानी कारभार आहे. एवढा वीज वापर झालाच नसेल तर हे युनिट आले कुठून?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
श्रीश्रीमाळ यांनी बिलाबाबत महावितरणकडे दाद मागितली असता, त्यांना बिल तपासून दुरुस्त करण्याऐवजी रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याचा अजब सल्ला देण्यात आला. महावितरणच्या या अशा उत्तरामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मीटर रीडिंग घेण्यातील चुका किंवा तांत्रिक बिघाडामुळे ही भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात तातडीने लक्ष घालून बिल दुरुस्त करून द्यावे, अशी मागणी जळगावकरांमधून केली जात आहे.
महावितरणच्या या चुकीच्या कारभाराचा फटका आता सोलर पॅनल बसवणाऱ्या ग्राहकांनाही बसू लागला आहे. शहरातील पटेल नगरमधील रहिवासी सुरेश जैन या सौरऊर्जा ग्राहकाने त्यांना मिळालेल्या जून महिन्याच्या बिलावर तीव्र हरकत घेतली आहे. नियमानुसार सौरऊर्जेच्या ‘एक्सपोर्ट’ (महावितरणला दिलेली वीज) युनिटची नोंद स्वतंत्रपणे करणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने ही वीज स्वतंत्र न दाखवता ग्राहकाने घरात वापरलेल्या (इम्पोर्ट) विजेमध्येच समाविष्ट केली. यामुळे जैन यांना जादा बिल आले आहे. या बिलाची तातडीने दुरुस्ती करावी आणि जादा आकारलेली रक्कम परत करावी किंवा पुढील बिलात समायोजित करावी, अशी मागणी जैन यांनी केली आहे.











