पर्यावरण शाळेचा अभिनव उपक्रम; विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव लाईव्ह न्यूज । भारतात सप्टेंबर महिना ‘बिग बटरफ्लाय मंथ’ (Big Butterfly Month) म्हणून साजरा केला जातो. याच कालावधीत फुलपाखरांचे जीवनचक्र अधिक सक्रिय होते. पर्यावरण संतुलनात फुलपाखरांचे अनन्यसाधारण महत्त्व आजच्या नवीन पिढीला समजावे, या उद्देशाने जळगाव येथील समर्पण संचालित श्रीमती सुभद्रा लक्ष्मण चौधरी इंग्लिश मीडियम स्कूल (पर्यावरण शाळा) यांच्यातर्फे आज शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एका चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

जळगाव शहरातील भाऊंचे उद्यान येथे ही स्पर्धा पार पडली. येथील निसर्गरम्य वातावरणात बसून विद्यार्थ्यांनी विविधरंगी फुलपाखरांची चित्रे अत्यंत कलात्मक रीतीने कागदामध्ये उतरवली. या स्पर्धेत शहरातील नंदिनीबाई शाळा, आनंदीबाई शाळा, भागीरथ स्कूल, विद्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि विवेकानंद प्रतिष्ठान यांसारख्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहने सहभाग घेतला.

स्पर्धेपूर्वी निसर्ग तज्ञ तथा पर्यावरण शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती अर्चना उजागरे यांनी विद्यार्थ्यांना उद्यानातील विविध जातींच्या फुलपाखरांची ओळख करून दिली आणि त्यांच्या जीवनचक्राबद्दल रंजक माहिती सांगितली.
पर्यावरणपूरक उपक्रमांची परंपरा: शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी निसर्ग संवर्धनासाठी पुढे यावे, यासाठी पर्यावरण शाळेतर्फे सातत्याने असे उपक्रम राबवले जातात. नुकतीच शाळेतर्फे आंतरशालेय ‘शाळू मातीचे गणपती बनवण्याची’ पर्यावरणपूरक कार्यशाळाही यशस्वीरीत्या पार पडली होती.
या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चेतना ननावरे यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या आणि पर्यावरणाविषयीजागृती निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे.









