जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या निवृत्तीनगर भागात मोबाईल चार्जिंगच्या बहाण्याने घरात घुसून ३३ वर्षीय महिलेच्या गळ्यावर सर्जिकल ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. या थरारक हल्ल्यात गायत्री पाटील (वय ३३, रा. निवृत्तीनगर, जळगाव) या गंभीर जखमी झाली असून, नागरिकांच्या सतर्कतेमुळे हल्लेखोर तरुणाला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्तीनगरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर गायत्री पाटील या एकट्या होत्या. याच परिसरातील सतीश शिंदे हा तरुण मोबाइल डिस्चार्ज झाल्याचे सांगत त्यांच्या घरात आला. मोबाइल चार्जिंगला लावल्यानंतर काही वेळ तो घरातच थांबला.

दरम्यान, अचानक गायत्री यांनी जोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून घराच्या खालच्या मजल्यावर राहणारे राकेश पाटील आणि त्यांच्या पत्नीने तातडीने वर धाव घेतली. त्यावेळी गायत्री या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या, तर सतीश शिंदे हा घरातच उभा असल्याचे आढळले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सतीश शिंदे याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. हल्ल्यात गायत्री यांच्या गळ्यावर धारदार सर्जिकल ब्लेडने वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. गळ्यावर गंभीर जखम झाल्याने त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला असून घटनेमागील कारण आणि हल्ल्याचे नेमके स्वरूप तपासातून समोर येणार आहे. या घटनेमुळे निवृत्तीनगर आणि परिसरात तीव्र संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे.








