मुंबईतील चौघांविरोधात अडावद पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । चोपडा तालुक्यातील अडावद येथील तरुणाला भारतीय नौदलात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने मुंबईतील चौकडीने सुमारे साडेसहा लाखांचा गंडा घातला. रक्कम घेवूनही नोकरी न लागल्याने व फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने न्यायालयाच्या आदेशाने चौघांविरोधात अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांमध्ये दोघा अल्पवयीनांचा समावेश आहे.
अडावद तालुक्यातील विलास विश्वास पाटील (वय-45) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा दिनेश पाटील यास भारतीय नौदलात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने संशयीत पुष्पा रवींद्र साळवी (38), हेमंत रघुनाथ धाळवे (40, रा.चारकोप कांदीवली, मुंंबई) व दोन अल्पवयीन संशयीतांनी जानेवारी 2020 च्या पहिल्या आठवड्यात व 20 मार्च 2020 रोजी अडावद येथील तक्रारदाराच्या घरी घेवून साडेसहा लाख रोख व बँकेद्वारे स्वीकारले होते.
आपण पैसे देऊन देखील नोकरी न लागल्याने व फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशान्वये चौघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक किरण दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शरीफ तडवी करीत आहेत.