⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

अवेळी खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे, व्यवसायिकांचे नुकसान तर घरगुती उपकरणांमध्ये बिघाड

जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा येथील धानोरा परिसरात महावितरणने सध्या खेळ मांडला असून दर अर्ध्या, एक तासाच्या अंतराने तर कधी कधी पाच-पाच मिनिटांनी तर कधी चारपाच तास वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. विजेच्या लपंडावाने “नागरिक त्रस्त, तर महावितरण मस्त” असे चित्र पहायला मिळत आहे.

वीज खंडित होण्याची कोणतीच ठराविक वेळ नसून वेळी अवेळी खंडित होणाऱ्या वीजपुरवठामुळे व्यावसायिक महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चांगलेच संतापले आहेत. महावितरणच्या या गलथान कारभाराने जणू काही अघोषित लोडशेडिंग करण्यात येत असल्याचा प्रत्ययच नागरिकांना येत आहे. वीज खंडित का झाली याची माहिती घेण्यासाठी कार्यालयाशी संपर्क केल्यास वीज खंडित झाल्याबरोबर कार्यालयातील ‘फोन’ अनेकदा बंद असल्याचा अनुभव देखील ग्राहकांना येत आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत.

विजेवर चालणाऱ्या उपकरणांमध्ये बिघाड

मागील काही दिवसांपासून धानोरा परिसरात विद्युत पुरवठा खंडित होणे, विद्युत दाब अचानक कमी जास्त होणे यासारखे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. अलिकडच्या काही दिवसापासून नेहमी वीजपुरवठा खंडित होत आहे. चुकून एखादे वेळी वीजपुरवठा सुरू झाला तर तो पुन्हा कधी खंडित होईल याचा अंदाजही नसतो. अचानक विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने व विद्युत दाब अचानक कमी-जास्त होत असल्याने विजेवर चालणाऱ्या उपकरणात बिघाड होत आहेत. वेळी अवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे याचा विपरित परिणाम विजेवर चालणाऱ्या उपकरणावर होत आहे. यामुळे अनेकांच्या टीव्ही, फ्रिज, कुलर, पंखा, झेराक्स मशीन, कॉम्युटरमध्ये बिघाड होत आहेत. त्यामुळेही नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

वीज देयकांच्या वसुलीसाठी तगादा

वीज देयकांच्या वसुलीसाठी कर्मचारी ग्राहकांच्या मागे तगादा लावून चालू बिल थकीत असले तरीही ग्राहकाचा वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई करणाऱ्यास आपल्या कर्मचाऱ्यांना भाग पाडणा-या महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वीज बील भरायला थोडा जरी उशीर झाल्यास वीज वितरण कंपनीचे वायरमन लगेचच वीज कनेक्शन तोडण्याची धमकी देतात. मग, वीज गायब झाल्यानंतर कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तोंडे का लपवतात, असा प्रश्न नागरिकांना पडला असून वीज वितरणाच्या सध्या सुरु असलेल्या विजेच्या लपंडावाबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका

विज वितरण कंपनीच्या नियोजन शून्य अनागोंदी कारभारामुळे धानोरेकर कमालीचे त्रस्त झाले आहेत. वीज दुरुस्तीचे कामाचे नियोजन न करता वेळी अवेळी दुरुस्तीचे कामे करुन वीज पुरवठा बंद करण्यात येत आहे. अचानक अवेळी वीज पुरवठा खंडित होत असून शहरातील वीजेवर अवलंबून असणाऱ्या व्यवसायिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शिवाय त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

लाईनच्या अडचणी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करू

चोपडा जवळील यावल रस्त्यावर एका शेतातील शेवरीचे झाडं मोठे वाढून ते लाईनच्या तारांना स्पर्श होतात म्हणून थोडे फार जरी वादळ आलं की याठिकाणी फॉल्ट होतो. परंतु लाईनमध्ये अडचण झाल्यावर रात्री-अपरात्री सुद्धा काम करून आम्ही सर्व विद्युत पुरवठा सुरळीत करतो. कर्मचारी कमी असल्याने कामात थोडा उशीर होतो. तरीपण लवकरात लवकर लाईट सुरु करण्याचा आमचा प्रयत्न असतो. एक-दोन दिवसात अजून बारकाईने पाहणी करून लाईन मध्ये काय अडचणी असतील त्या दूर करण्यात येतील असे असे धानोरा येथील सहाय्यक अभियंता घरझारे यांनी सांगितले.

हे देखील वाचा: