जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२४ । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. विशेष या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण ४० नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश आहे. असं असलं तरी या यादीत एक महत्त्वाचं नाव नाही. त्याचीही चर्चा रंगली आहे.
या यादीत शिवसेनेच्या लोकसभेतील प्रमुख नेत्याचंच नाही. शिवसेना शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांचं नाव या यादीत नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राहुल शेवाळे यांचं नाव या यादीत का नाही? याची चर्चा आता रंगली आहे. मात्र राहुल शेवाळे यांच्या नावाची वेगळी घोषणा स्टार प्रचारक म्हणून केली जाऊ शकते.
खरे तर आजवर पंतप्रधान मोदींनी कधीही शिवसेनेचा प्रचार केलेला नाही. मात्र यावेळी ते पहिल्यांदाच हे काम करणार आहे. एकनाथ शिंदे गटाची खरी शिवसेना झाल्यानंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अजित पवार देवेंद्र फडणवीस प्रचार करताना दिसतील.
शिवसेनेच्या स्टार प्रचारक यादीत यांचाही समावेश
या यादीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, शिवसेना नेते रामदास कदम, शिवसेना नेते गजानन किर्तीकर, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मिलिंद देवरा, मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या मीना कांबळी, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री दिपक केसरकर, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री संजय राठोड, आमदार भारत गोगावले यांची नावे आहेत. त्याचबरोबर माजी मंत्री दिपक सावंत, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय शिरसाट, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार मनिषा कायंदे, मुख्य समन्वयक नरेश म्हस्के, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, प्रवक्ते राहुल लोंढे, उपनेते कृपाल तुमाने, आमदार आशिष जैयस्वाल, पूर्व विदर्भातील शिवसेना संघटक किरण पांडव हे नेते शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करतील, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.