यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

जून 11, 2026 5:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावच्या ह.भ.प जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे यावल तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

Cataract Free Campaign

संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील,जेष्ठ नेत्ररोग तज्ञ वैद्यकिय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर यांच्या मार्गदर्शनानुसार या मोहिमेअंतर्गत १० जून रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत,मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाचे समन्वयन डॉ. नि. तु. पाटील यांची प्रमुख उपस्थीती होती. यावल तालुक्यातील गाडर्‍या, जामन्या आणि उसमली या तीन गावांमध्ये मोतीबिंदू तसेच कान-नाक-घसा तज्ञांची टीम उपस्थीत होती. यावल तालुक्यातील २४ टप्प्यांमध्ये विविध गावांमध्ये नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिरांमध्ये नेत्र विभागासोबतच इतर विविध विभागांतील रुग्णांचीही तपासणी केली जाणार असून आवश्यकतेनुसार आरोग्य मार्गदर्शन व उपचार दिले जाणार आहेत.तपासणीत मोतीबिंदू अथवा इतर नेत्रविकार आढळलेल्या रुग्णांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया व पुढील उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हे अभियान विशेष लाभदायी ठरणार आहे. एकूण ६६ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १६ रुग्णांना पुढील मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रेफर करण्यात आले आहे. तपासणीदरम्यान नागरिकांना डोळ्यांचे आरोग्य, मोतीबिंदूची लक्षणे, वेळेवर उपचारांचे महत्त्व तसेच कान-नाक-घसा विकारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने अशा शिबिरांचे विशेष महत्त्व असल्याचे आयोजकांनी सांगितले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. वैष्णव, डॉ. गौरव, डॉ. दर्शनी आणि डॉ. मुग्धा यांनी विशेष प्रयत्न केले. स्थानिक ग्रामस्थांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानत भविष्यातही अशी शिबिरे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.दि १२ रोजी मानपूर,मालोद,वाघझिरा आणि नायगाव तर १५ रोजी मोहराळे, हरिपुरा,वद्रि तर १७ रोजी धुलेपाडा,कालाडोह,हिंगोणा आणि १९ रोजी डांभुर्णी,कोळन्हावी,डोणगाव या ठीकाणी तंज्ञाची टीम पोहचणार आहे.५ ऑगस्ट रोजी अकलुद,भालोद आणि अट्रावल येथे शिबिराचा समरोप केला जाणार आहे.

रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, ग्रामीण भागातील गरीब व गरजू नागरिकांपर्यंत अत्याधुनिक आरोग्यसेवा पोहोचविणे ही संस्थेची सामाजिक बांधिलकी आहे. तपासणीपासून शस्त्रक्रिया व पुढील उपचारांपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देत यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now