⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या खुनांचा तीव्र धिक्कार! : जिल्ह्यात बोंबाबोंब आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ । उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा व कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. बारा पेक्षा अधिक शेतकऱ्यांना भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात आले असून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाने एका शेतकऱ्याला गोळ्या घालून मारल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीन केंद्रीय काळे कायदे रद्द करा व किफायतशीर आधार भावाचा केंद्रीय कायदा करा या प्रमुख मागण्यासाठी दिल्लीत दहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या उपमुख्यमंत्री व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना सभा स्थळाकडे जात असताना काळे झेंडे दाखवण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उभे होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री टेनी यांचा मुलगा आशिष मिश्र टेनी याने व त्याच्या गुंडांनी शेतकऱ्यांना शांततामय आंदोलन करत असताना त्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडून टाकले.

भारतीय शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील ही अत्यंत काळीकुट्ट घटना आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध पक्ष व संघटना या क्रूर घटनेचा तीव्र शब्दात धिक्कार करत आहे. संयुक्त किसान मोर्चाने सबंध देशभर या घटनेचा तीव्र धिक्कार करण्यासाठी शांततामय मार्गाने निषेध व्यक्त करणारी आंदोलने करण्याचे आवाहन केले आहे. जळगाव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर या घटनेचा निषेध करणारे निवेदने देण्यात आले असून बोंमाबोंम आंदोलन करत निदर्शनांच्या माध्यमातून भाजपप्रणीत दडपशाही, गुंडागर्दी व रक्तपातपूर्ण भ्याड हल्ल्यांचा जळगाव जिल्ह्यातील सर्व संघटना व पक्ष संयुक्त रित्या धिक्कार करत आहे.ह्या वेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनातील मागण्या –
1)केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. टेनी यांना तातडीने बडतर्फ करा,
२)केंद्रीय राज्य मंत्री चा मुलगा आशिष मिश्रा व त्याच्याबरोबर हल्ल्यात सामील असणाऱ्या सर्वांवर 302 कलमाखाली हत्येचा गुन्हा दाखल करा व सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा,
३) मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना एक करोड रुपये व त्यांच्या मुलांना नोकरी तसेच जखमी शेतकऱ्यांना 25लाख रुपये नुकसान भरपाई द्या
4) संविधानिक पदावर असताना लोकांना हिंसा करण्यासाठी फडकवणाऱ्या हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर तात्काळ बरखास्त करा त्यांना मुख्यमंत्री पदावरून काढून टाका, अशी मागणी करत आहे.

आपल्या कॉर्पोरेट साथीदारांना शेतीचे संपूर्ण क्षेत्र नफा कमावण्यासाठी व अनिर्बंध मक्तेदारी निर्माण करण्यासाठी बहाल करण्याच्या अत्यंत कुटील हेतूने केंद्र सरकारने तीन केंद्रीय कृषी कायदे केले आहेत. आपल्या कॉर्पोरेट भागीदारांना नफा कमावता यावा यासाठी प्रसंगी शेतकऱ्यांचे बळी घेत केंद्र सरकारला हे कायदे अमलात आणायचे आहेत. मात्र संयुक्त किसान मोर्चा केंद्र सरकारचे हे कुटील कारस्थान कधीही साध्य होऊ देणार नाही. संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती ने अत्यंत नेटाने लोकशाही चौकटीत व शांततेच्या मार्गाने आपले आंदोलन सुरू ठेवले आहे व यापुढे आंदोलन अधिक तीव्र करेल व जोपर्यंत हे तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द केले जात नाहीत व शेतकऱ्यांना शेती संकटातून बाहेर काढण्यासाठी किफायतशीर आधार भावाचे संरक्षण देणारा केंद्रीय कायदा केंद्र सरकार करत नाही तोपर्यंत आपला लढा सनदशीर मार्गाने सुरूच ठेवतील. ह्या अखिल भारतीय संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाला जळगाव जिल्ह्यातील सर्व संघटना व संयुक्त किसान मोर्चा जळगाव यांचा कृतिशील पाठिंबा आहे असे जाहीर समर्थन ह्या वेळी घोषणा देत व तीव्र भाषण करत नेत्यांनी निर्धार व्यक्त केला. ह्या वेळी खालील प्रतिनिधी सह कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, शिवसेनेचे विष्णू भंगाळे, समाजवादी पार्टीचे रईस बागवान, काँग्रेसचे जमील शेख, मौलाना आझाद विचार मंचचे उपाध्यक्ष, करीम सालार, राष्ट्रवादी काँग्रेसचे एजाज मलिक, रामधन पाटील, प्रा.सुनील गरूड, सोमनाथ माळी, भाऊसाहेब सोनवणे, प्रमोद घुगे, लोकसंघर्ष मोर्चा चे सचिन धांडे, पन्नालाल मावळे, राजेंद्र चव्हाण, नारीशक्ती ग्रुपच्या मनीषा पाटील, मंगला बारी, युवा सेना प्रमुख शिवराज पाटील ,महाराष्ट्र जन क्रांती मोर्चाचे भारत ससाणे, दिलीप सपकाळे, आकाश सपकाळे, लोकसंघर्ष मोर्चा चे युवक अध्यक्ष भरत कर्डीले ,सागर पाटील, विवेक महाजन, विराज बनीट, कैलास मोरे, गोलू पवार, संजय पवार, कैलास पाटील, सुभाष पवार , वाल्मीक पवार, फाईम पटेल  आदी उपस्थित होते.