लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी; डिसेंबरच्या हप्त्याची तारीख ठरली
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२४ । महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकाळात महत्वाचा रोल प्ले करणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणी करीत आहे. डिसेंबरच्या हप्त्याची वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.
महायुती सरकारने महाराष्ट्रातील अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जुलै महिन्यात सुरू केली. त्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. दरमहा १५०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जातात. आत्तापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच हफ्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित हप्ता महिलांना देण्यात आला होता. त्यामुळे एकूण ७५०० रुपये आत्तापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. दरम्यानच्या काळात ही योजना आचारसंहितेमुळे रखडली. मात्र आता महायुतीचं सरकार स्थापन झालेलं असल्याने पुढचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
अशातच महिलांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा पुढच्या दोन ते तीन दिवसांत जमा होणार असल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना त्यांचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळतील असं त्यांनी म्हटलं आहे.
थकीत पैसे येण्यास सुरुवात..
दरम्यान, ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज करूनही काही तांत्रिक कारणांमुळे अजून एकही रुपया मिळाला नव्हता, अशा महिलांच्या खात्यामध्ये शुक्रवारपासून थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. तर आता डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.