ग्राहकांना मोठा दिलासा ! पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त!

जुलै 1, 2026 5:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | १ जुलै २०२६ । आखाती देशातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर देशात इंधनाचे दर वाढले होते. दरम्यान, आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने देशातील अग्रगण्य खासगी इंधन विक्री कंपनी ‘नायरा एनर्जी’ने ग्राहकांना मोठा दिलासा दिला देत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात जाहीर केली आहे. नव्या निर्णयानुसार, आज १ जुलै २०२६ पासून देशभरातील नायराच्या सर्व पंपांवर पेट्रोल ५ रुपये प्रति लिटर तर डिझेल ३ रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे.

petrol diesel

गेल्या काही महिन्यांत पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १२५ डॉलरच्या पार गेले होते. मात्र, आता तिथला तणाव कमी झाला असून जागतिक इंधन पुरवठ्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ हा समुद्री मार्ग पुन्हा एकदा पूर्ववत झाला आहे. त्यामुळे कच्चे तेल आणि एलएनजीचा (LNG) पुरवठा सुरळीत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव ७० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले आहेत. याचाच थेट फायदा नायरा एनर्जीने ग्राहकांना दिला आहे. नायरा एनर्जीचे देशभरात ७ हजारांहून अधिक पेट्रोल पंप असून, १ जुलैपासून सर्व ठिकाणी हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.

आज वेगवेगळ्या शहरांमध्ये नायरा एनर्जीच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फरक आहे. सर्वात स्वस्त पेट्रोल चंदीगडमध्ये ₹101.54 प्रति लिटर आहे, तर सर्वात जास्त दर हैदराबादमध्ये ₹115.69 प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये हे दर ₹111.21 आहेत. चंदीगडमध्ये डिझेलचा दर ₹89.47 प्रति लिटर आहे. दरम्यान, हैदराबादमध्ये डिझेल सर्वात महाग असून त्याचा दर ₹103.82 प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये डिझेलचे दर 97.83 आहेत.

विशेष म्हणजे, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत एवढी मोठी घसरण होऊनही सरकारी तेल कंपन्यांनी (IOC, BPCL, HPCL) मात्र अद्याप इंधन दरात कोणतीही कपात केलेली नाही. देशातील एकूण १ लाखांपेक्षा जास्त पेट्रोल पंपांपैकी ९० टक्क्यांहून अधिक (सुमारे ९० हजार) पंप या तीन सरकारी कंपन्यांचे आहेत. त्यामुळे आता खासगी कंपनीने पाऊल उचलल्यानंतर सरकारी कंपन्याही दर कमी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now