लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! संक्रांतीआधी डिसेंबर-जानेवारीचे एकत्र ३००० रुपये मिळणार?
जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’च्या लाभार्थींसाठी एक खुशखबर आहे. या योजनेच्या अंतर्गत, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये संक्रांतीआधी डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्र ३००० रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आलीय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि निराधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. आतापर्यंत, लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जमा करण्यात आले आहेत. लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पाच हप्त्याचे आतापर्यंत ७५०० रुपये जमा झाले आहेत.
आता डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. पण या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हफ्ता एकत्र मिळणार आहेत. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी आर्जदारांचा आकडा २ कोटी ४७ लाखांपर्यंत आहे.
तसंच, राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच २१०० रुपये जमा होणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा निर्णय मार्च महिन्यामध्ये महायुती सरकार घेणार आहे. मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हफ्ता देण्याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार आहे.