⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

खडसे, महाजन, महाविकास आघाडीचा पराभव अन् चंद्रकांत पाटलांचा विजय!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील बोदवड नगरपंचायतचा निकाल नुकतेच जाहीर झाला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. बोदवडचा निकाल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसेंना जबर धक्काच आहे परंतु भाजपाचे संकटमोचक आ.गिरीश महाजन यांना देखील चिंतन करायला लावणारा आहे. नेत्यांसोबतच या निवडणुकीत जेष्ठ नेत्यांनी ठरविले असते ते महाविकास आघाडी करून निवडणूक सहज जिंकणे शक्य होते परंतु तसे देखील प्रयत्न झाले नाही. राज्यात असलेली आघाडी तालुक्यात मात्र बिघाडी ठरली. आजच्या निकालात खडसे, महाजन यांचा पराभव झाला असला तरी आ.चंद्रकांत पाटील यांचा मात्र विजय झाला आहे. शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकते हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

जळगाव जिल्ह्यात भाजपच्या विस्तारात मोठा वाटा असलेले जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व कमी अधिक होत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यात पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात खडसेंना मानणारा एक गट जिल्ह्यात असला तरी त्याच गटातील काही लोक भाजपाला मानणारे देखील आहेत. बोदवडच्या गेल्या निवडणुकीत एकनाथराव खडसे भाजपात होते आणि राज्यात व देशात देखील भाजपची सत्ता होती. आज मात्र चित्र संपूर्ण उलट आहे. खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांना मानणारे काही सोबत राहिले तर काहींनी आपलं आहे तोच पक्ष ठेवण्यात धन्यता मानली. एकनाथराव खडसे यांचे भाजपात असताना आणि भाजप सोडल्यानंतर अनेकांची वितुष्ट निर्माण झाले होते आणि तेच राजकीय शत्रू आज त्यांच्याविरुद्ध वारंवार एकत्र येत आहेत.

बोदवड निवडणुकीत एकनाथराव खडसेंनी प्रतिष्ठा पणाला लावलेली होती तर दुसरीकडे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्यासाठी देखील निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. बोदवडला महाविकास आघाडी नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने संपूर्ण १७ जागेवर आपले उमेदवार दिले होते. विधानसभा निवडणुकीचा अनुभव असताना देखील खडसे पुन्हा ती चूक होऊ देणार नाही अशी खात्री वाटत असली तरी निकाल मात्र तेच सांगून गेले. बोदवडला राष्ट्रवादीची नव्हे तर शिवसेनेची सत्ता आली. मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळी सुरुवातीपासून ऍड.रोहिणी खडसे या आघाडीवर होत्या. त्यांचा विजय निश्चित मानला जात असताना बोदवड गटातील मतपेट्या फुटण्यास सुरुवात झाली आणि संपूर्ण चित्रच पालटले. अपक्ष निवडणूक लढविणारे चंद्रकांत पाटील विजयी झाले आणि नवीन इतिहास रचला गेला.

मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीच्या निकालाने खडसे आणि पाटील यांच्यातील वितुष्ठ आणखीनच वाढले. गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात दोघांकडून एकमेकांवर अनेकवेळा टीकाटिपण्णी झाली. राज्यात महाविकास आघाडी असली तरी खडसे आणि पाटील यांच्यातील वाद जेष्ठ नेते शमवू शकले नाहीत. बोदवड निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेला ९ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागा तर भाजपला एका जागेवर ईश्वर चिठ्ठीने विजय मिळाला आहे. खडसे यांचा पराभव बोदवडच्या निकालाने दिसून आला असला तरी सर्वात मोठा पराभव संकटमोचक आ.गिरीश महाजन यांचा आणि भाजपचा आहे. गेल्या निवडणुकीत भाजपची सत्ता असलेला गड राखण्यात महाजन अपयशी ठरले आहेत. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून आ.महाजन यांना धक्क्यावर धक्का बसत असून जिल्ह्यातील भाजपसाठी हि धोक्याची सूचना आहे.

आजच्या निवडणुकीत झालेला विजय हा शिवसेनेचा देखील नसून सर्वस्वी आ.चंद्रकांत पाटील यांचाच आहे. चंद्रकांत पाटलांना मुलुख मैदान तोफ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेली जोड देखील महत्वाची मानली जातात आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आ.चंद्रकांत पाटील आणि आ.गिरीश महाजन यांचे असलेले संबंध काही लपून राहिलेले नाही. विधानसभा निवडणूक ते बोदवड नगरपंचायत सर्वांनीच ते पहिले आहेत. वैयक्तिक राजकारणासाठी पक्षाला दावणीला लावणे भाजपच्या संस्कृतीत मात्र काही बसत नाही. खडसेंचा पराभव झाला असला तरी दारुण पराभव न झाल्याने काहीसे समाधान आहे परंतु भाजप मात्र ईश्वर चिट्टीने तारली गेली हे निश्चित आहे. जळगावातील राजकारणात पुढे आणखी काय वाढून ठेवले आहे हे तर येणारा काळच सांगणार असला तरी आजच्या निकालातून खडसे, महाजन यांच्यासह नेत्यांनी चिंतन करणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा :