⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगाव शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मनपाचा त्रिसूत्री प्लॅन, अंमलबजावणीची प्रतिक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । शहरामध्ये वाढत असलेल्या धुळीच्या प्रमाणामुळे शहराच्या हवेची गुणवत्ता कमी होत आहे. यावर केंद्रीय समितीने गेल्या आठवड्यात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शहराचे प्रदूषण कसे कमी होईल यासाठी उपायोजना तयार करण्याच्या ॲक्शन प्लॅन तयार करण्याची मागणीही समितीने यावेळी केली होती. समितीच्या सूचनांची दखल घेत प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. दरम्यान, हा त्रिसूत्री  कार्यक्रम प्रशासनासमोर केव्हा ठेवला जाईल आणि अंमलात केव्हा येइल हे मात्र अद्याप निश्चित नाही.

जळगाव शहरातील हवेची गुणवत्ता कमी होत आहे असा निष्कर्ष केंद्रीय समितीने काढला होता. याच पार्श्वभूमीवर जळगाव शहराच्या हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी जळगाव महानगरपालिका देखील सज्ज झाली आहे. यासाठी जळगाव महानगरपालिकेने त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेतला असल्याची माहिती मनपातील सूत्रांनी दिली आहे.

असा आहे मनपाचा ॲक्शन प्लॅन

१) जळगाव शहरात धुळीचे प्रमाण खूप वाढले असून याचा परिणाम जळगाव शहराच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये झाला आहे अशी तक्रार केंद्र शासनाच्या पथकाने केली होती. मात्र जळगाव शहरात सध्या अमृत योजनेचे भुयारी गटाराचे काम सुरू असल्यामुळे शहरात एकच खोदकाम सुरू आहे. ज्यामुळे जळगाव शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र जळगाव शहरासाठी ६४ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.  नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही सर्व कामे पूर्ण होणार आहेत व नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस जळगाव शहराचे रस्ते पूर्णतः डांबरी असतील. यामुळे धुळीचा प्रश्न मार्गी लगणार आहे.  जळगाव शहराचे रस्ते अधिक दर्जेदार करण्यासाठी केंद्राकडून देखील निधीची मागणी करण्यात येणार आहे.

२) जळगाव शहरात घाणीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर असल्याची तक्रार केंद्रीय पथकाने केली होती. यावर देखील महानगर पालिकेने तोडगा काढायचे निश्चित केले आहे. ज्यामध्ये महापालिकेनुसार जळगाव शहरात आता घंटा गाडीचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे व जे नागरिक कचरा करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे.

३) कोणत्याही शहराचा जर प्रदूषण कमी करायचा असेल तर झाडे लावणे हे हा एक महत्त्वपूर्ण पर्याय आहे. यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली असून लवकरच शहरात विविध ठिकाणी झाडे लावण्यात येणार आहेत व विविध गार्डन उभारण्यात येणार असून तिथे मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्यात येतील.