नगरसेवक सोनवणेंचा दोन्ही तंबूत पाय

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । शहर मनपातील सदस्य सुरेश सोनवणे यांचा पाय सध्या दोन्ही तंबूत आहे. सोनवणे अधिकृतपणे भाजपचे असले तरी शिवसेनेचे शिवबंधन देखील त्यांनी बांधले आहे. सध्या सेना-भाजपचा अधिकृत कुणी असेल तर ते सुरेश सोनवणे हेच म्हटले जातील.

जळगाव शहर मनपात सत्तांतर नाट्य घडत असताना भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेची वाट धरली. अगोदर ३० गेल्यानंतर पुन्हा ३ नगरसेवकांनी मनगटावर शिवबंधन बांधले. ज्या भाजपने उपमहापौर पदासाठी आपले नगरसेवक गमावले तेच उमेदवार सुरेश सोनवणे बंडखोर निघाले.

भाजपच्या २७ नगरसेवकांनंतर मुंबई येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तीन नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते. त्यात सुरेश सोनवणे यांचाही समावेश होता. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर आणि माध्यमातून याबाबतचे वृत्त प्रकाशित झाले होते. दरम्यान, भाजपच्या बंडखोर नगरसेवकांना अपात्रते प्रकरणी नोटीस मिळणार असल्याचे कळताच सोनवणे यांनी यू-टर्न घेतला आणि मी माझ्या भाजप सोडलाच नसल्याची भुमिका त्यांनी मांडली.

दोन दिवसापूर्वी सुरेश सोनवणे यांनी सोशल मीडियात व्हायरल केलेल्या त्यांच्या एका पोस्टमध्ये शिवसेनेच्या एकही नेत्याचा फोटो नव्हता इतकच काय तर सोनवणे यांनी केवळ नगरसेवक असा उल्लेख त्याठिकाणी केला होता. सोनवणे यांना काही जणांनी त्या पोस्टवरून डिवचले असता शिवबंधन बांधल्याने कोणीही शिवसेनेचा होत नाही आणि आम्ही निधी मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलो असल्याचा उत्तर त्यांनी दिले.

सुरेश सोनवणे हे सध्या दोन्ही पारड्यात आपलेच माप ठेवू पाहत असून त्यांच्यासाठी इतर सदस्य मात्र ते आमचे हाच पवित्रा घेत आहेत.