हप्ते घेतात का तुम्ही?; हॉकर्सच्या पुनरागमनवरून महापौरांचा संताप, अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती

मे 26, 2026 6:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरामध्ये महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईदरम्यान एक अत्यंत नाट्यमय आणि हायव्होल्टेज प्रकार पाहायला मिळाला. वारंवार कारवाई करूनही हॉकर्स (फेरीवाले) पुन्हा त्याच जागेवर कसे येतात? असा संतप्त सवाल करत माजी महापौर दीपमाला काळे यांनी उपस्थित पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाहीरपणे चांगलेच धारेवर धरले. “पुन्हा जर इथे हॉकर्स दिसले तर तुम्ही सगळे सस्पेंड व्हाल,” अशा कडक शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली.

dpk

स्टेडियम परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेची पाहणी करण्यासाठी माजी महापौर दीपमाला काळे पोहोचल्या होत्या. यावेळी तिथे पुन्हा अतिक्रमणाची स्थिती पाहून त्यांचा पारा चढला. त्यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली. अधिकाऱ्यांवर उघडपणे तोफ डागत त्या म्हणाल्या, “इथे वारंवार कारवाईचा देखावा केला जातो, मात्र प्रशासनाच्या नाकाखालून हॉकर्स परत त्याच जागेवर कसे येतात? हप्ते घेण्याचं काम तर तुम्हाला अगदी पटकन करता येतं!” माजी महापौरांच्या या थेट आणि गंभीर आरोपामुळे उपस्थित पालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच बोलती बंद झाली होती.

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसर हा शहरातील गजबजलेला आणि महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी पालिकेचे पथक कारवाई करते, मात्र पथक निघून जाताच काही तासांत फेरीवाले पुन्हा रस्ते आणि फूटपाथ काबीज करतात, अशा तक्रारी नागरिक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी थेट मैदानात उतरून अधिकाऱ्यांना सुनावल्याने पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now