⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जळगावात डेल्टा प्लस विषाणूचे ७ रुग्ण, राज्यात २१ रुग्ण आढळले

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी, जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबई येथे दिली. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. जळगावात डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांनी अधिकची खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी सांगितले की, महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सीएसआयआर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ केसेस आढळून आले आहेत.

या केसेससंदर्भात पुढील कार्यवाही अशी करण्यात येत आहे की, या इंडेक्स केसेसची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का याबाबत माहिती घेऊन त्यांच्या निकट सहवासितांची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाचा विषाणू बदलत असून डेल्टा प्लस हा अधिक घातक मानला जात आहे. शासनाने सांगितलेल्या त्रिसूत्रीचा वापर करावा आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जळगाव लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून करण्यात येत आहे.