जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२५ । महाराष्ट्रावर पुन्हा एकदा पावसाचं सावंट आहे. आगामी चार ते पाच दिवस राज्यभरात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील. तर १२ ऑक्टोबरनंतर मान्सून एक्झिट घेईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात आजपासून ८ ऑक्टोबरपर्यंत विजा आणि वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.

आधीच सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीवर आलेले पिके अतिवृष्टीमुळे मातीमोल झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला तर नाले, नद्यांचं पाणी थेट अनेकांच्या घरात शिरल्याने संसार उघड्यावर आले. सध्या काही दिवसापासून पावसाने उसंती घेतली असून यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र यातच हवामान खात्यानं जळगावसह राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ धडकणार आहे. या शक्ती चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याचं सांगण्यात आलं आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवरील समुद्राची स्थिती अत्यंत धोकादायक असणार आहे.
जळगावात बरसणार पाऊस
दरम्यान जळगाव शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी आजपासून ते ८ ऑक्टोबर दरम्यान किरकोळ आणि ढगाळ वातावरणासह दुपारनंतर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी विजा आणि वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. जळगावसह धुळे, नंदुरबार या ठिकाणी प्रभाव पडेल. या कालावधीत ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे आणि विजांचा धोका आहे.
ऑक्टोबर तापदायक नसेल
यंदा ऑक्टोबर हीटचा त्रास जाणवणार नाही. त्यामुळे हा महिना तितकासा तापदायक नसेल. ऑक्टोबरमध्ये जळगावचे कमाल तापमान ३६ किंवा ३७ अंश नोंदविण्यात येते. यावर्षी कमाल तापमान ३२ ते ३३ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हीटपासून जळगावकरांची सुटका होणार आहे.











