मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर; जळगावात कधी पोहोचणार? तारीख आली समोर

जून 6, 2026 10:34 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२६ । यंदा मान्सूनचे आगमन नेहमीपेक्षा काहीसे उशिराने होत असले, तरी त्याचा पुढील प्रवास आता वेगाने सुरू झाला आहे. ५ जून रोजी गोव्यात यशस्वी प्रवेश केल्यानंतर, मान्सून शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्रात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, जळगाव शहर व जिल्ह्यात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

monsoon jpg webp

मान्सूनने मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या बऱ्याच भागांत आगेकूच केली आहे. दक्षिण भारतात मान्सून सक्रिय झाल्यामुळे आता महाराष्ट्रातील त्याच्या आगमनाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. हवामान अनुकूल राहिल्यास वीकेंडला म्हणजेच शनिवार-रविवार दरम्यान मान्सून राज्यात धडकेल.

पुढील दोन दिवस असे राहणार हवामान?

मान्सूनच्या या प्रवासादरम्यान स्थानिक पातळीवर वातावरणात बदल होत असून, जळगावात पुढील दोन दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज ६ जून (शनिवार) रोजी दिवसभर ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान ३९ ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तर ७ जून (रविवार) रोजी कमाल तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. जिल्ह्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि गडगडाटासह वादळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

सध्या तापमानाचा पारा घसरला असला तरी उकाड्याने जळगावकर हैराण झाले आहे. त्यातच पावसाचा अंदाज असल्याने उकाड्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून प्रवेश करणार असला, तरी उत्तर महाराष्ट्राचा विचार करता जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत आगामी १६ ते २१ जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. मात्र, वातावरणातील बदल आणि समुद्रावर उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे या तारखांमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now