जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२६ । महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सूनने अद्याप हवा तसा जोर पकडला नसला तरी, हवामान विभागाकडून एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून राज्याच्या इतर भागांमध्ये वेगाने मार्गक्रमण करणार आहे. सध्या मान्सून दक्षिण कोकण, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला असून, लवकरच तो उर्वरित महाराष्ट्रात पोहोचेल. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देत ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

खान्देशात कधी बरसणार? जळगावसाठी महत्त्वाचा अंदाज

उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. जळगाव, नाशिक आणि धुळे या खान्देशातील जिल्ह्यांमध्ये ११ ते १८ जून या कालावधीत वादळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनच्या या आगमनामुळे खान्देशातील उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार असून, शेतीच्या कामांनाही गती येण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील इतर जिल्ह्यांचा हवामान अंदाज
कोकण आणि मुंबई: रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये १० जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये ११ जून रोजी पाऊस हजेरी लावेल. मुंबईत आजच फोर्ट परिसरात रिमझिम पाऊस सुरू झाल्याने मुंबईकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.
पश्चिम महाराष्ट्र: कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात १० जून रोजी पावसाची शक्यता आहे, तर अहिल्यानगरमध्ये १२ जून रोजी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये १२ ते १५ जून दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
विदर्भ: नागपूरसह आसपासच्या परिसरात १५ आणि १६ जून रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एकीकडे पावसाचे आगमन होत असतानाच, चंद्रपूरमध्ये उष्णतेचा, तर पालघरमध्ये उष्णतेसह दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरणासह उन्हाचा चटका आणि उकाडा पुढील काही दिवस कायम राहू शकतो.






