जळगावकरांची अंगाची लाहीलाही; अर्धा जून संपला तरी पावसाची प्रतीक्षा, पुढील पाच दिवस असे राहणार वातावरण?

जून 12, 2026 10:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२६ । एप्रिल-मे महिन्यातील कडक उन्हाळ्यानंतर जूनमध्ये मान्सूनचे आगमन होऊन उष्णतेपासून दिलासा मिळेल, अशी जळगावकरांची अपेक्षा होती. मात्र, जूनचा अर्धा महिना उलटूनही पावसाने हजेरी लावलेली नसल्याने नागरिकांची प्रतीक्षा कायम आहे. त्यातच आता तापमानासह हवेतील आर्द्रतेत (दमटपणा) कमालीची वाढ झाल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असून जळगावकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.

tpj

मे महिन्यात जळगावचा पारा तब्बल ४५ अंशांपर्यंत पोहोचला होता. मात्र, त्यावेळी वातावरण कोरडे असल्याने नागरिकांना केवळ उष्णतेच्या झळा (लू) सहन कराव्या लागल्या होत्या. जून महिन्यात मात्र परिस्थिती बदलली आहे. तापमान मे महिन्यापेक्षा थोडे कमी असले, तरी हवेत बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. या दमट वातावरणामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत असून, पंखे आणि कुलरही अपुरे पडू लागले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाची शक्यता नसून उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ३ ते ४ दिवसांत जळगाव जिल्ह्याचा पारा ४२ ते ४३ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या तुलनेत तापमान थोडे कमी वाटत असले, तरी वातावरणातील आर्द्रता (दमटपणा) अत्यंत जास्त राहणार आहे. तापमान आणि आर्द्रता या दोन्हीमुळे जळगावकरांना केवळ उष्णतेचे चटकेच बसणार नाहीत, तर अंगातून घामाच्या धारा वाहून जीव नकोसा होणार आहे. सध्या समुद्राकडून आलेली ओलसर हवा व गरम जमीन यांच्या एकत्रित परिणामामुळे हवेत प्रचंड दमटपणा वाढला आहे.

मान्सून कधी सक्रिय होणार?

हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाचे संकेत दिले असले, तरी जळगाव जिल्ह्यात अद्याप मोठ्या पावसाने हजेरी लावलेली नाही. हवेतील ही आर्द्रतेची वाढ म्हणजेच मान्सून पूर्व स्थिती असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता जळगावकरांचे डोळे फक्त आभाळाकडे लागले असून, कधी एकदाचा जोरदार पाऊस पडतो आणि या जीवघेण्या उकाड्यापासून सुटका होते, याचीच प्रतीक्षा सर्वांना आहे.

आगामी पाच दिवस जळगावचे वातावरण कसे राहिल..
दिनांक, तापमान आणि वातावरणाची स्थिती

१२ जून : ४२ अंश, उष्ण व दमट हवामानाचा अंदाज
१३ जून : ४२ अंश, उष्ण व दमट हवामानाचा अंदाज
१४ जून : ४३ अंश, उष्ण व दमट हवामानाचा अंदाज
१५ जून : ४१ अंश, उष्ण व दमट हवामानाचा अंदाज
१६ जून : ४२ अंश, मुख्यत्वे कोरडे हवामान

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now