⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

चाळीसगावात मुलं चोरणारी महिला समजून एका निराधार महिलेला बेदम मारहाण!

Chalisgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यात सध्या मुले फिरणारी गॅंग आली असल्याचे मेसेज तुफान व्हायरल होत आहेत. लहान मुलांना घरात ठेवा असे आवाहन मेसेजद्वारे केले जात आहे. याच संशयावरून चाळीसगाव शहरात तोंडाला रुमाल बांधलेली एक महिला फिरत होती. तिला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, कुठे अशी संशयित व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी कायदा हातात न घेता थेट पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव शहरात तोंडाला रुमाल बांधलेली एक महिला फिरत होती. त्या महिलेने तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने नागरिकांनी त्या महिलेवर मुलं चोरत असल्याचा संशय घेतला. याच संशयावरून नागरिकांनी तिला मारहाण केली. त्या महिलेचं नागरिकांनी काही एक ऐकून न घेता जोड्या आणि चपलांनी मारहाण केली. तसेच महिलेला पोलीस ठाण्यात नेत पोलिसांच्या ताब्यात दिले.

या प्रकरणी पोलिसांनी महिलेची चौकशी केली. ही महिला खंडवा येथील असून तिचे कुणीही नातेवाईक नाही. पण मिळेल त्या ठिकाणी मिळेल ते काम करून महिला तिचा उदरनिर्वाह भागवते, अशी माहिती समोर आली आहे. त्या महिलेचा चेहरा पूर्णतः जळलेला होता. यामुळे तिने तोंडाला रुमाल बांधलेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र नागरिकांनी घटनेची खातरजमा न करता कायदा हातात घेत महिलेला मारहाण केली. महिलेची चौकशी करून त्या महिलेला जळगाव येथील आशादीप या शासकीय वसतीगृहात दाखल केले आहे, अशी माहिती पोलीस निरिक्षिक के. के. पाटील यांनी दिली आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मुले चोरणारी टोळी सक्रिय झाल्याचे मॅसेज सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन चाळीसगाव शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. कुठे अशी संशयित व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी कायदा हातात न घेता थेट पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.