Google Pay, PhonePe वापरताय? RBI ने बदलले ‘हे’ नियम; आता पैसे पाठवण्यापूर्वी ही बातमी वाचा..

एप्रिल 11, 2026 4:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सध्याच्या डिजिटल युगात खिशात रोकड ठेवण्याऐवजी मोबाईलवरून स्कॅन करून पैसे देण्याचे प्रमाण वाढले आहे. पण वाढत्या डिजिटल व्यवहारांसोबतच सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. यावर लगाम घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आता कंबर कसली असून, गुगल पे (Google Pay), फोन पे (PhonePe) आणि इतर UPI Apps वापरणाऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

upi

आरबीआयच्या नव्या प्रस्तावानुसार, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर करत असाल, तर ती रक्कम तात्काळ समोरच्या व्यक्तीच्या खात्यात जमा होणार नाही. यासाठी युजर्सना १ तास प्रतीक्षा (Cooling-off period) करावी लागणार आहे.

काय होणार फायदा?

जर या एक तासाच्या काळात तुम्हाला जाणवले की तुम्ही चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवले आहेत किंवा तुमच्यासोबत फसवणूक होत आहे, तर तुम्ही तो व्यवहार तातडीने थांबवू शकता. यामुळे फसव्या लिंक्स किंवा कॉल्समुळे होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल.

मोबाईल हरवला तरी टेन्शन नाही; येतंय ‘किल स्विच’

डिजिटल सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी आरबीआय ‘किल स्विच’ (Kill Switch) नावाची एक नवीन सुविधा आणत आहे. जर तुमचा मोबाईल फोन हरवला किंवा हॅक झाला, तर या सुविधेद्वारे तुम्ही एका क्लिकवर तुमचे सर्व डिजिटल व्यवहार त्वरित बंद करू शकता.तुमच्या परवानगीशिवाय कोणतेही ट्रांजेक्शन होणार नाही, ज्यामुळे खाते सुरक्षित राहण्यास मदत होईल.

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सुरक्षा

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना सायबर चोरटे सहज लक्ष्य करतात. हे रोखण्यासाठी आरबीआयने ५०,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी अतिरिक्त पडताळणी (Extra Verification) अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठ्या रकमेचे व्यवहार करताना सुरक्षिततेचा एक जादा स्तर निर्माण होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now